मालवणात मोटारसायकल रॅलीव्दारे पोलिस स्टेशन गाठत ना. राणे यांच्या अटकेचे निवेदन
*⚡मालवण ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद मालवण मध्ये उमटून शिवसैनिकांनी शिवसेना शाखेसह भरड नाका येथे जोरदार घोषणाबाजी करत नारायण राणेंचा निषेध व्यक्त केला. हम से जो टकरायेगा… मिट्टी मे मिल जायेगा… उद्धव ठाकरे अंगार है… बाकी सब भंगार है… नारायण राणे यांचा निषेध असो अशा घोषणा शिवसैनिकांनी देत पोलीस स्टेशनवर मोटारसायकलच्या रॅलीव्दारे पोलिस स्टेशन गाठत नारायण राणे यांच्या अटकेचे निवेदन मालवण पोलिसांना दिले. दरम्यान, जिल्ह्यातील शांतता भंग करण्याचे काम नारायण राणे यांनी केले असून बाळासाहेबांचे शिवसैनिक हे लढवय्ये असून जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज मालवणातही उमटताना दिसले. शिवसेना व भाजप मध्ये तापलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळपासूनच मालवण शिवसेना शाखा, भाजप कार्यालय व चिवला बीच येथील नारायण राणे यांचा निलरत्न बंगला याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शिवसेना कार्यालयात जमलेल्या शिवसैनिकांनी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली साडे बारा वाजण्याच्या सुमारास शिवसेना शाखेसमोर शक्तिप्रदर्शन करत घोषणाबाजी केली यावेळी नारायण राणे यांच्या तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर भरड नाका येथेही शिवसैनिकांनी जमून जोरदार घोषणा बाजी केली. त्यानंतर शिवसैनिकांनी मालवण पोलीस ठाणे गाठत मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा मागणीचे निवेदन पोलिसांना सादर केले. तसेच कारवाई न झाल्यास शिवसेनेकडून उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही शिवसैनिकांनी दिला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेवक मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, किरण वाळके, तपस्वी मयेकर, मंदार गावडे, बाळू नाटेकर, भाई कासवकर, महिला आघाडीच्या पूनम चव्हाण, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, नंदा सारंग, अंजना सामंत, दीपा शिंदे, बंड्या सरमळकर, उमेश मांजरेकर, रमेश कद्रेकर, नरेश हुले, नंदू गवंडी, आदी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
