हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची शासनाकडे मागणी
*⚡मालवण ता.२३-:* देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला हा गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा किल्ला असून पर्यटनाबरोबरच ऐतिहासिकदृष्ट्या हा किल्ला महत्त्वाचा आहे. मात्र, या किल्ल्याच्या माहिती व महत्त्वाविषयी महाराष्ट्र अनभिज्ञ असून विजयदुर्गची विजयगाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि गौरवशाली इतिहासाचा जागर व्हावा या दृष्टीने विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी विजयदुर्ग किल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, तसेच गडकिल्ले जतन आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. छत्रपती शिवरायांनी वर्ष १६५३ मध्ये हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचे ‘विजयदुर्ग’ असे नामकरण केले. मराठा साम्राज्याचे शक्तीस्थळ असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हा नावाप्रमाणेच गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मराठा आरमाराला प्रभावी बनवले आणि इंग्रज, चाचे, जंजिर्याचे सिद्धी, पोर्तुगीज अशा सागरी सत्तांना शह दिला; परंतु आजमितीला यावर प्रकाश टाकणारे पुरेसे साहित्य नाही. या गोष्टी केवळ पर्यटनाच्या दृष्टीनेच नव्हे, तर ऐतिहासिक, नाविक अशा अनेक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. ईस्ट इंडीया कंपनीच्या स्वारीला मूठभर नाविकांनी विजयदुर्गावरून कशी मात दिली, हे आज महाराष्ट्राला माहिती नाही. या किल्ल्यावर पर्यटन विकास महामंडळाने उभारलेला एक पडका फलक उभा आहे; मात्र तोही अपुरा आहे, असे इचलकरंजीकर यांनी निवेनात म्हटले आहे. शासनाने विजयदुर्ग किल्ल्याविषयीच्या संशोधनाची व्यापक प्रसिद्धी करावी. वर्ष १९९८ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या शासकीय संस्थेने विजयदुर्ग किल्ला व परिसराबाबत केलेल्या संशोधनाला आधारभूत धरून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुढील संशोधन करावे. तसेच या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याचा गौरवशाली इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांत व शासकीय संकेतस्थळांवरही प्रसिद्ध करावा, अशी मागणी इचलकरंजीकर यांनी केली आहे.
