सावंतवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविकानी नादुरुस्त मोबाईल अधिकार्‍यांकडे केले सुपूर्त

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी केले नेतृत्व

*⚡सावंतवाडी ता.२३-:* तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण अभियान अंतर्गत देण्यात आलेले मोबाईल आज अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या उपस्थितीत अंगणवाडी सेविकानी येथील एकात्मिक बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधताना राज्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेल्या मोबाईल नादुरुस्त झाल्याने तसेच त्यांची वॉरंटी संपल्याने पुन्हा नव्याने चांगल्या प्रतीचे मोबाईल देण्यात यावे तसेच त्यामध्ये मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती मात्र या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने सदरचे मोबाईल शासनाकडे जमा करण्याचा निर्णय कृती समितीने हाती घेतला आहे. आज सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड बांदा निरवडे सांगेली आंबोली आदी आठ बीट मधील तब्बल २६७ मोबाईल एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्री मात्रे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी कुंदना कावळे,कामिनी कुडव,आवडता दळवी,विजया राणे, निलम गाड,आरती कोरगावकर,स्नेहा कारिवडेकर,शोभा सावंत,मिलम जाधव, स्मिता सावंत, पूजा मुळीक, पुष्पलता नाईक, श्रद्धा गुरव, रश्मी मेस्त्री, गीता परब, सरिता जंगले आधी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. यावेळी बोलताना कमलताई परुळेकर म्हणाल्या ,शासनाने पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०१९ मध्ये अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप केले होते. सदर मोबाईलची वॉरंटी दोन वर्षे कालावधीची असून तो कालावधी मे २०२१ मध्ये संपला आहे. सदर मोबाईल २ जीबी रॅम चा आहे. मोबाईलमध्ये लाभार्थीची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप इ. सविस्तर माहिती भरण्यात येते. मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्यामुळे व त्यांत भरावयाची माहिती जास्त असल्यामुळे हे मोबाईल हँग होतात, लवकर गरम होतात व त्या मोबाईलवर काम करणे कठिण होते. सदर मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो आता जुना झाल्यामुळे सतत नादुरूस्त होतो. त्याच्या दुरुस्तीसाठी तीन ते आठ हजार रुपये खर्च होतो व तो अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातो. महाराष्ट्रांत हजारो मोबाईल बिघडलेले आहेत व ३ हजार पेक्षा जास्त मोबाईल बंद पडलेले आहेत. केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप दिले आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये रॅम कमी पडत असल्यामुळे हे ऍप डाउनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना आपल्या खाजगी वैयक्तिक मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करावे लागते. सदर ऍप इंग्रजी मध्ये असल्यामुळे अनेक कर्मचा-यांना त्रयस्थांच्या मदतीशिवाय माहिती भरणे शक्य होत नाही. हे काम दैनंदिन स्वरूपाचे आहे. रोज त्रयस्थ व्यक्तीकडून माहिती भरणे शक्य नाही. शिवाय, या अॅपमध्ये डिलीटचा पर्याय नसणे, वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम किंवा द्यायच्या सेवांबाबत त्याचप्रमाणे कोणतेही मार्गदर्शन न येणे, माहिती भरण्याची पध्दत अतिशय किचकट असल्यामुळे, या त्रुटीमुळे अंगणवाडी सेविका त्रस्थ झाल्या आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना इंग्रजीत अॅप मध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती करणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे शासनाने सदर चे ॲप मराठीमध्ये देण्याबरोबरच चांगल्या प्रतीचा मोबाईल अंगणवाडी सेविकांना द्यावा अशी आमची मागणी आहे, असे कमलताई परुळेकर यांनी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page