*⚡मालवण ता.२३-:* तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामनिधीमधून तारकर्ली गावासाठी कचरा वाहक गाडी खरेदी करण्यात आली असून या गाडीचे लोकार्पण विश्वनाथ मोंडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. पर्यटन गाव असलेल्या तारकर्ली गावात कचऱ्याची समस्याही निर्माण होत असल्याने या कचरा वाहक गाडीने गावातील वाड्यांमधील तसेच समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचल करणे शक्य होणार असून या कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाटही लावण्यात येणार आहे असे यावेळी सरपंच सौ. स्नेहा केरकर यांनी सांगितले. या कचरा वाहक गाडीच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच स्नेहा केरकर यांच्यासह सदस्य डॉ. जितेंद्र केरकर, ज्योती धुरत, सरपंच स्नेहा केरकर, डॉ. जितेंद्र केरकर, रतीलाल तारी, नरेंद्र तारी, प्रफुल्ल मांजरेकर, प्रमोद पेडणेकर, राकेश चव्हाण, अमित आचरेकर, बबन मांजरेकर, महेश मयेकर, शंकर वायंगणकर, जितेंद्र तारी, पार्थ तारी, माधुरी तारी, संध्या वायंगणकर, सुप्रिया केरकर, विनायक ओटवणेकर आरोग्य सेविका एस. ए. काटकर, साक्षी कासकर, ज्ञानेश्वर शिरोडकर, निशा टिकम, अंकिता मुंबरकर आदी व ग्रामस्थ उपस्थित होते. पर्यटन गाव असणाऱ्या तारकर्लीमध्ये कचरा गाडीची मागणी वेळोवेळी होत होती. म्हणूनच ग्रामपंचायत व जि. प. च्या माध्यमातून कचरा गाडी उपलब्ध केली आहे. तारकर्ली गावात पर्यटनामुळे भविष्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी ग्रामपंचायतीकडून आतापासूनच नियोजन करण्यात येत असून कचरा गाडी द्वारे कचऱ्याच्या समस्येवर काहीअंशी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच कचरा विलगीकरण व विल्हेवाट याबाबत गाव कृती समिती व बचत गट यांच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यात येईल. येत्या काळात कचरा निर्मूलन उपाययोजना व घरोघरी शोष खड्डे आदी उपक्रमही राबविले जाणार आहेत, अशी माहिती यावेळी डॉ. जितेंद्र केरकर यांनी दिली. तर ग्रामपंचायतीच्या कचरा वाहक गाडीच्या उपक्रमाला ग्रामस्थानी सहकार्य करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन ग्रामस्थ अमित आचरेकर यांनी केले.
तारकर्ली ग्रामपंचायतीच्या कचरा वाहक गाडीचे लोकार्पण
