अन्यथा आंदोलन छेडणार : भाजपचे काका परब यांचा इशारा
*⚡बांदा दि.२३-:* पाडलोस केणीवाडा येथील स्ट्रीट लाइट गेले चार महिने बंद अवस्थेत आहे. तौक्ते चक्रिवादळानंतर ते आजतगायत रस्त्यावरील स्ट्रिट लाईट बंद असल्यामुळे त्या दरम्यानचा वीज कर आकारू नये. येत्या चार दिवसांत केणीवाडा स्ट्रीट लाईट सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, युवामोर्चा सावंतवाडी तालुका सरचिटणीस काका परब यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सरपंच अक्षरा पाडलोसकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे तसेच माजी ग्रा. पं. सदस्य तथा भाजप बूथ उपाध्यक्ष हर्षद परब, अमोल नाईक, गोविंद पराडकर, गोकुळदास परब, बाबू कुबल आदी उपस्थित होते. हर्षद परब म्हणाले की, तौक्ते वादळानंतर ग्रामस्थांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. परंतु गेले चार महिने केणीवाड्यातील स्ट्रीट लाईट बंद असून याची दखल ग्रामपंचायत प्रशासनाने का घेतली नाही, त्यादरम्यान सुरू झालेली लाईट पुन्हा बंद का झाली अशा अनेक प्रश्नांना ग्रामपंचायत प्रशासनास सामोरे जावे लागले. अमोल नाईक यांनी स्ट्रीट लाईटचे ब्रॅकेट मोडकळीस आल्याचे सांगितले. चक्रीवादळानंतर वीज पुरवठा बंद असल्याने याचा आर्थिक भुर्दंड ग्रामस्थांना भरावा लागणार आहे. त्यामुळे त्या दरम्यानच्या कालावधीतील वीज कर माफ करावा. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनास आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करणार. जर प्रशासनाने स्ट्रीट लाईट येत्या चार दिवसात सुरू न केल्यास सर्व ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे काका परब यांनी सांगितले. दरम्यान, सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत वीज अधिकाऱ्यांना यासंदर्भात वेळोवेळी सूचना दिल्याचे सांगितले. तरी देखील नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेत येत्या चार दिवसांत कोणत्याही परिस्थितीत केणीवाड्यातील स्ट्रीट लाईट सुरू होणार असल्याचे आश्वासन दिले.
