व्याजाची मागणी करणार नाही असे हमीपत्र घेणेच चुकीचे:सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा सवाल
*⚡कणकवली दि.२३-:* सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाकडून व्याजाची मागणी करणार नाही असे हमीपत्र घेणेच पूर्णत : चुकीचे असून सुद्धा ते ऐच्छिक आहे असे कळविणे यालाही शिक्षक प्रतिनिधीचा पूर्ण विरोध आहे . निवृत्त होणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याने आपल्या देय रकमा संबंधात अशा कोणत्याही प्रकारचे हमीपत्र देऊ नये . मुळातच निवृत्त कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी शासन आग्रही असताना प्रशासन चुकीचे निर्देश का देते व आपल्या पत्रात संदिग्धता का ठेवतात तेच समजत नाही . अशी माहिती सुरेश पेडणेकर , चंद्रकांत अणावकर , सुधाकर देवस्थळी , सोनू नाईक व आनंद पेडणेकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे . प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त होताना त्यांच्याकडून एकुण निवृत्ती विषयक आधिक लाभासंदर्भात भनिनि , गटविमा इत्यादी पाच प्रकारचे प्रस्ताव पूर्ण करुन घेतले जातात. कोणत्याही नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याना त्यांच्या रकमा वेळीच मिळाव्यात म्हणून शासनाने त्यांचे निवृत्ती विषयक सर्व प्रकारचे प्रस्ताव किमान सहा महिने अगोदर पाठविण्याबाबत आदेश केलेले आहेत . तसेच भविष्य निर्वाह निधीचे हप्ते हे तीन महिने अगोदर बंद करून त्याचे हिशेब पुरे करुन कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर लगतच्या येणाऱ्या महिन्यात भनिनि रक्कम आदा करावयाची असते. भनिनिची रक्कम ही पूर्णत संबंधित कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनातून कपात करुन घेण्यात आलेली असते . ती सर्व रक्कम जिल्हा परिषदेकडेच असते . त्यामुळे ती कोठून यावयाची आहे तसेच अनुदान आल्यावरच मिळेल असा त्यात कोणताही संबंध नसतो. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या सर्व प्रकाराच्या रकमा ह्या निवृत्तीनंतर तात्काळ देण्याबाबत शासनाचे आदेश आहेत . तसेच एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या देय रकमा विलंबाने अदा झाल्यास विलंब कालावधीच्या व्याजासह द्यावयाची असते . त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने अर्ज किंवा विनंत्याही करण्याची गरज नाही असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत . असे असूनही जि.प च्या प्राथमिक शिक्षण विभागाने दि . ०२/०६/२०२० च्या पत्राने सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना भनिनिचे प्रस्ताव तयार करताना दिलेल्या सूचीतील मुद्दा क्र . १० नुसार कर्मचाऱ्याला संबंधित रक्कम मिळण्यास विलंब झाल्यास मी व्याज मागणी करणार नाही अशाप्रकारचे हमीपत्र घ्यावे असे आदेश करण्यात आले . परंतु अशाप्रकारचे हमीपत्र घेण्यास शिक्षक प्रतिनिधीनी लेखी आक्षेप नोंदविला . तसेच दि . ०२/०८/२०२१ च्या मा . मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत या बाबीबाबत विरोध दर्शविला . त्यावेळी मा . मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असे करता येणार नाही असे स्पष्ट सूचीत केले . त्यामुळे मा . शिक्षणाधिकारी यांनी दि . १७/०८/२०२१ च्या पत्राने प्रस्ताव सादर करण्यास उशीर झाल्यास सेवानिवृत्त कर्मचारी जबाबदार न राहता संबंधित कार्यासन कर्मचारी जबाबदार राहील असे लेखी कळविले आहे . तसेच या पत्रात हमीपत्र ऐच्छिक स्वरुपाचे आहे , असेही नमूद आहे . खरे पाहता अशाप्रकारचे व्याजाची मागणी करणार नाही असे हमीपत्र घेणेच पूर्णत : चुकीचे असून सुद्धा ते ऐच्छिक आहे असे कळविणे यालाही शिक्षक प्रतिनिधीचा पूर्ण विरोध आहे . अशी माहिती सुरेश पेडणेकर , चंद्रकांत अणावकर , सुधाकर देवस्थळी , सोनू नाईक व आनंद पेडणेकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे .
