*⚡बांदा दि.२१-:* बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक राजन गवस यांनी कोविड साथ निवारण कार्यक्रमात बांदा शहरात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या वतीने ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गवस यांना गौरविण्यात आले. राजन गवस हे बांदा आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी बांदा परिसरात आलेल्या माकडताप साथीत उत्कृष्ट सेवा बजावली होती. कोविड कार्यकाळात देखील गवस यांनी शासनाच्या साथ निवारण कार्यक्रमात सहभागी होत सेवा बजावली. त्यांच्या या कार्याची दखल जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली. सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी कोरोना योद्धा हे प्रमाणपत्र दिले आहे. आमदार केसरकर यांच्या हस्ते गवस यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अण्णा केसरकर आदी उपस्थित होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडुन बांदा आरोग्यसेवक राजन गवस यांचा सन्मान
