…म्हणून महाराष्ट्र शासनाचा गुणगौरव करावा तेवढा थोडाच आहे

प्रा . महेंद्र नाटेकर यांची उपरोधिक घणाघाती टिका

*⚡कणकवली ता.१८-:* कोरोनाचे निमित्त करुन अत्यल्प काळ शाळा कनिष्ठ महाविद्यालये सुरु असल्याने अध्यापन – अध्ययन प्रक्रिया ठप्प झाली होती , ऑनलाईन शिक्षण पध्दतीने अध्यापन करण्याचा प्रयत्न झाला असला तरी इंटरनेट व अन्य सुविधा पुरेशा नसल्याने सुमारे ३० % च विद्यार्थ्यांनाच त्याचा लाभ झाला . अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे निकाल फारच कमी लागणार हे निश्चित असताना सर्व विद्यार्थी केवळ पासच झाले नाहीत तर हजारो विद्यार्थी १०० % गुण मिळवून गुणवत्ता यादीत आले ! म्हणून महाराष्ट्र शासनाचा गुणगौरव करावा तेवढा थोडाच आहे अशी उपरोधिक घणाघाती टिका जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा . महेंद्र नाटेकर यांनी केली . प्रा . नाटेकर पुढे म्हणाले , अध्यापन -अध्ययन प्रक्रियेतून शारीरिक , मानसिक , बौध्दिक विकास करुन विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभा राहणारा माणूस निर्माण करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे . विविध भाषांच्या अध्यापनातून भावनांचा संतुलित विकास करता येतो गणिताच्या अध्यापनातून बुध्दीचा विकास करुन तर्क सुसंगती साधता येते . विज्ञानाच्या अध्यापनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करता येतो . व्यायामाने बलदंड शरीर निर्माण करुन प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करता येते . यातून लाथ मारीन तेथे पाणी काढीन असा स्वतःच्या पायावर उभा राहणारा माणूस निर्माण करता येतो किंबहुना माझ्या अध्यापन काळात तसा तो माणूस मी निर्माण केला आहे यातल काहीच न करता गतवर्षीच्या वार्षिक परीक्षेचे गुण , न झालेल्या अंतर्गत चाचण्या मौखिक परीक्षा हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुणदान करुन ” रेकॉर्ड ब्रेक ” निकाल जाहीर केले . हे निकाल पाहताना संताप अनावर होतो. हसावे की रडावे तेच कळत नाही . अशा प्रकारचे निकाल असूनही संबधित विद्यार्थी व शिक्षकांचे सत्कार सोहळे आयोजित केले जातात.हा तर कडेलोटच झाला ! लग्न समारंभ असेल तर पाचशे , राजकीय सभा असेल तर पाच हजाराची कायदेशीर उपस्थिती चालते . प्रत्यक्षात लाखोच्या राजकीय सभा होतात तर कोरोना नियमांचे पालन करुन शाळा- महाविद्यालये सुरु ठेवून परीक्षा घेणे शक्य होते . योग्य शिक्षणाने देश घडतो . अयोग्य देश उध्वस्त होतो हे जर्मनीने लक्षात घेऊन पहिली पासून पदवीपर्यंत मोफत शिक्षण सुरु केले आहे .आज कोरोना काळातही तेथील अध्ययन – अध्यापन प्रक्रिया नियमितपणे सुरु आहे. राजकारण्यांनी शिक्षणाला फार गौण स्थान दिले आहे . पहिली ते आठवी परीक्षाच रद्द केल्या आहेत . त्यामुळे नववीत विद्यार्थी नापास होतात . म्हणून विद्यार्थ्याला नापास न करता वरच्या वर्गात घालावा व एस्.एस्.सी ला सर्व विद्यार्थ्याला बसवावे . विद्यार्थी नापास झाला तरी त्याची त्वरित परीक्षा घेऊन पास झाल्यास लगेच प्रवेश द्यावा , असे शासनाचे धोरण आहे . अशा ह्या शिक्षणपध्दतीतून आपल्या पिढ्या घडण्याऐवजी बिघडतात . राजकारणीही त्याला अपवाद नाहीत. यावेळी प्रा . पी . बी . पाटील , प्रा . सुभाष गोवेकर , ए . वाय . चिलवान , जे . जे . दळवी ,प्रा . रमेश बापट इत्यादींनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला . प्रा . गोवेकरांनी आभार प्रदर्शन केले .

You cannot copy content of this page