प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्याची ग्रामस्थाची मागणी
*⚡वेंगुर्ले ता.१६-:* तालुक्यातील शिरोडा वेळागरला सध्या समुद्राच्या अजस्त्र लाटांचा मोठा तडाका बसत असून किनाऱ्याची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरक्षेसाठी बांधलेल्या एक किलो मीटर लांबीच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची दैनावस्था झाली आहे. बंधाऱ्याचे दगड व जाळी फाटून वाहून गेली. तसेच समुद्राचे खारे पाणी आता माड बागायतीमध्ये घुसून नुकसान होत आहे. तरी शासनाने वेळीच लक्ष द्यावे हो पुढे होणारी मोठी हानी टाळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. शिरोडा वेळागर येथे 10 वर्षा पूर्वी सर्व्हे नंबर 39 या भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसून नुकसान झाले होते. बागायती मध्ये पाणी घुसून किनाऱ्यावर झाडे उन्मळून पडून वाहून गेली होती. मात्र शासनाने त्यावेळी एक रुपयाची नुकसान भरपाई दिली नाही. मात्र वेळागर वासीयानी एकजुट करीत आवाज उठवला होता म्हणून तेथे शासनाला धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रस्ताव सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपये मंजूर करावा लागला. एक किलोमीटर लांबीचा हा बंधारा मंजूर करून तो बांधण्यात आला. मात्र बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गेल्या चार – पाच वर्षांपासून बंधाऱ्याचे दगड बाहेर पडणे, तारा तुटून जाणे असे प्रकार सुरू आहेत. गतवर्षी म्हणजेच सन 2020 मध्ये मेरी टाईम बोर्डाचे अधिकारी यांनी सदर बंधाऱ्याची पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आश्वासन स्थानिक ग्रामस्थांना दिले होते. प्रत्यक्षात त्याला एक वर्ष होऊन गेले, मात्र दुरुस्तीसाठी काहीही प्रयत्न या खात्याने केले नाहीत. सद्या सन 2021 च्या जुन, जुलै व आगस्ट मध्ये सुरू असलेल्या वादळी वाऱ्या पावसामुळे या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची अवस्था बिकट बनली आहे. दगड जाळी वाहून जाऊन शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. या बंधाऱ्याची हमी अधिकाऱ्यांनी 50 वर्षे दिली होती. परंतु आठ दहा वर्षात बंधाऱ्याची परिस्थिती कठीण बनली आहे. या बंधारा पासून सागर सुरक्षा वर अवलंबून राहणे जिकरीचे आहे. समुद्राचे खारे पाणी भरतीच्या वेळी या बंधार्यावरून आत घुसत असून किनाऱ्यावरील भगत व अमरे यांच्या माड बागायतीमध्ये येते. त्यामुळे माड बागायती चे नुकसान होत आहे. तरी शासनाच्या संबंधित विभागाने त्वरित या बंधाऱ्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. वेळेत याकडे लक्ष दिला नाही तर वेळागर वासीय या विरोधात आंदोलन छेडतील असा इशारा वेळागर वासीय व सर्वे नंबर 39 समिती चे अध्यक्ष आणि शिरोडा ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे यांनी दिला आहे.
