मनसे सरचिटणीस परशूराम उपरकर यांनी टीका
*⚡मालवण ता.१६-:* समुद्री अतिक्रमणामुळे तळाशील गावचे दोन तुकडे झाल्यावर धावाधाव करण्यापेक्षा आतापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र तसे प्रयत्न शासन व लोकप्रतिनिधींकडून होताना दिसत नाही. समुद्र व खाडीच्या अतिक्रमणापासून धोका निर्माण झालेल्या तळाशील गावातील लोक समुद्रात बुडून मरतील की काय अशी स्थिती सरकारने आणि सरकारच्या लोकप्रतिनिधींनी करून ठेवली आहे. तळाशील वाचविण्यासाठी या किनारपट्टीवर कोट्यावधी रुपयांच्या बंधाऱ्याची गरज असताना शासन ५४ लाख मंजूर करून तळाशीलच्या ग्रामस्थांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे काम करत आहे, अशी टीका मनसेचे राज्य सरचिटणीस, माजी आमदार परशूराम उपरकर यांनी तळाशील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी बोलताना केली. सागरी अतिक्रमणगग्रस्त तोंडवळी गावच्या किनारपट्टीवर कायमस्वरूपी बंधारा होण्याच्या मागणीसाठी तळाशील ग्रामस्थांनी छेडलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनास मनसे नेते परशुराम उपरकर यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या समवेत मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, शैलेश अंधारी, अमित इब्रामपुरकर, विनायक गावडे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तौक्ते वादळानंतर कोकण समुद्र किनारपट्टीच्या संरक्षणासाठी २५० कोटी खर्च करण्याची घोषणा केली. याच निधीतून सागरी अतिक्रमण ग्रस्त गावात संरक्षक बंधारे होण्याची प्रथम मागणी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार व पतन विभागाकडे केली होती. तळाशील गावाची सध्याची स्थिती पाहता या निधीतून तळाशील गावासाठी कायम स्वरूपी बंधारा होणे गरजेचे आहे. या किनारपट्टीवर १४०० मीटर लांबीचा कायमस्वरूपी बंधारा होणे गरजेचे असून यासाठी आधीपासून प्रयत्न होणे महत्वाचे होते. परंतु ते लोकप्रतिनिधी व शासनाकडून झालेले नाही. कोट्यावधी रुपयांच्या बंधाऱ्याची गरज असताना सरकार मात्र ५४ लाख देऊन येथील ग्रामस्थांच्या डोळ्याला पाणी लावण्याचे काम करत आहे, असेही उपरकर म्हणाले. तात्पुरते स्वरूपाचे बंधारे होणार असतील तर त्या बंधाऱ्याच्या कामासाठी तातडीने मंजुरी आणणेही गरजेचे आहे. तसेच बंधाऱ्याचे काम सुरू झाल्यावर ठेकेदार किती किलोचे दगड टाकतोय हे ग्रामस्थानी पाहिले पाहिजे. तळाशील साठी कायमस्वरूपी बंधारा होणेच गरजेचे समुद्री अतिक्रमणामुळे तळाशील गावचे दोन तुकडे झाल्यावर धावाधाव करण्यापेक्षा आतापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे, कायम स्वरूपी बंधारा झाला तरच तळाशील गाव वाचू शकेल, या बांधाऱ्यासाठी आपणही शासनाकडे पाठपुरावा करत राहू, असेही परशुराम उपरकर म्हणाले.
