डेगवे ग्रामस्थांचे रस्त्यासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतसमोर उपोषण

*⚡बांदा दि.१३-:* डेगवे होळीचा खुंट ते तांबोळी तिठा दरम्यानचा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. अनेक वेळा अपघात घडूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्ही डेगवे-मोयझरवाडी ग्रामस्थ 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपअभियंता सावंतवाडी यांना दिले आहे. तसेच जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी मंदार देसाई, अमोल देसाई, अमृत देसाई, संजय देसाई, प्राची देसाई, भाग्यश्री देसाई, संजीवनी देसाई, मेघा देसाई, भरत देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते. धोकादायक खड्ड्यांनी भरलेला होळीचा खुंट ते तांबोळी तिठा रस्ता वाहतुकीस निर्धोक करण्याची गरज आहे. याबाबत शासन दरबारी वारंवार कळवूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. दिवसा रात्री-अपरात्री नवख्या वाहनचालकांना सुद्धा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन कोणतीही जीवित वा वित्तहानी होण्यापुर्वी रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणे आवश्यक आहे. प्रशासनाने सदर रस्त्याची दखल न घेतल्याने आम्हाला स्वातंत्र्यदिनी डेगवे ग्रामपंचायतसमोर लोकशाहीचा मार्ग पत्करावा लागला असल्याचे उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी सांगितले. सकाळी 9 वाजता उपोषणाला सुरुवात होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

You cannot copy content of this page