दारु कंपनीकडून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल न घेतल्यास लढा उभारू

*माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांचा इशारा

*⚡सावंतवाडी ता.१३-:* साऊथ कोकण डीस्टलरीज या ‘दारू फॅक्टरी’तील काचेच्या बाटल्या व काचा स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात पुरामुळे विखुरल्या गेल्यान शेतीचे नुकसान झाले आहे. याची दारु कंपनीकडून व प्रशासनाकडून योग्य दखल घेतली न गेल्यास प्रशासनाविरोधात संपूर्ण गावाला घेऊन लढा उभारू, यात जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याला पुर्णपणे कंपनी जबाबदार राहील, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी दिला. याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबतची मागणी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देऊन केली होती. दरम्यान, आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जात वस्तुस्थितीची पहाणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा तहसीलदारांसमोर मा़ंडल्या. शेत जमिनीत काचेच्या बाटल्या घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या बाटल्या ह्या काचेच्या असल्याने त्या शेती जमिनीतून काढणे गरजेचे आहे. या करीता संबंधित फॅक्टरी मालकाला वस्तुस्थितीची विचारणा केली असता या गोष्टी विचारल्याचा राग आल्याने त्या मालकांन फॅक्टरीत काम करणारी मुले यांना फॅक्टरीत घेणार नाही असे सांगत त्यांना कामावरून काढून टाकले, अशी कैफियत मांडली.‌ यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आपणही शेतकरी असून शेतकऱ्यांचा भावना जाणतो, त्यामुळे वस्तुस्थिती पहाता याबाबत वरिष्ठांच लक्ष वेधत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी बबन राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, उपसरपंच काका चराटकर, नारायण उर्फ बबन राणे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, सचिन पालव, भाजप तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, रवी परब, महादेव मोरजकर, नाना परब, तलाठी अनिल आयरे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page