भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा इशारा
मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना जाहीर झालेली मदत ही फक्त २० टक्के नुकसानग्रस्तांनाच मिळाली आहे. चक्रीवादळात नुकसाग्रस्तांचे पंचनामे तयार करताना प्रशासनाने आमदार वैभव नाईक यांच्या दबावाखाली काम केले. आम. नाईक हे प्रशासनावर दबाव आणून आपल्या सोयीचे राजकारण करून केवळ आपल्या माणसांची कामे करत आहेत, त्यामुळे शिवसेनेशी संबंधित असणाऱ्यांना लोकांना मदत मिळाली असून अनेक नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहिले, अशी टिका भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत करतानाच मदतीपासून वंचित राहिलेल्या नुकसानग्रस्तांना मदत न मिळाल्यास भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. मालवण भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर हे बोलत होते. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, आबा हडकर आदि व इतर उपस्थित होते. यावेळी चिंदरकर म्हणाले, देवबाग येथील अनेक तोक्ते नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहिल्याच्या घटनेला भाजप नेते दत्ता सामंत यांनी वाचा फोडल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी पंचायत समिती, तहसील कार्यालय येथे बैठका घेतल्या. देवबागसह अनेक गावातील नुकसानग्रस्त शेतकरी, बागायतदार, मच्छीमार हे मदतीपासून वंचित राहिले आहेत. नुकसान भरपाई जाहीर झालेल्यांची यादी मागितली असता ती प्रशासनाकडून देण्यात येत नाही. मग मदत मिळालेल्या नुकसाग्रस्तांची यादी सोशल मिडीयावर कशी काय फिरत आहे ? तर आधीच्या वादळाच्या वेळी नुकसान भरपाई न मिळाल्याने लोकांनीही प्रशासनाकडे जाणे पसंत केले नाही. तसेच कोरोना निर्बंधांमुळे नुकसानग्रस्त लोक प्रशासनापर्यंत पोहचू शकले नाहीत. असे असताना वादळानंतर जबाबदार अधिकारी असणाऱ्या तलाठी, कृषी अधिकारी, मत्स्य अधिकारी नुकसानग्रस्त लोकांपर्यंत पोहचले नाहीत. सर्व विभागात गलथान कारभार सुरू आहे. आम. वैभव नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याच्या प्रयत्नामुळे ठराविकच नुकसाग्रस्तांना मदत मिळाली, असा आरोप धोंडी चिंदरकर यांनी केला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी होऊन त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच वादळातील जे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहिले आहेत त्यांना मदत न मिळाल्यास भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही धोंडी चिंदरकर यांनी दिला.
