भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची कार्यकर्त्यांच्यावतीने मागणी
मालवण दि प्रतिनिधी भाजपचे नेते दत्ता सामंत यांना शिवसेनेत येण्यासाठी आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेकदा प्रयत्न केले मात्र दत्ता सामंत यांनी आपण नारायण राणे यांचे कार्यकर्ते असल्याने त्यांना सोडून आपण कुठे जाणार नाही असे त्यांना सांगितले होते. तसेच दत्ता सामंत यांनी आपण कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचे यापूर्वी वेळोवेळी स्पष्ट केल्याने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्न पक्षाचा आहे परंतु निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी अशी आम्हा कार्यकर्त्यांचीच इच्छा असल्याचे प्रतिपादन भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष श्री.धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. मालवण भाजपा कार्यालयात तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली. चिंदरकर म्हणाले, भाजपा नेते दत्ता सामंत यांनी तौक्ते वादळात नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई न मिळाल्याने आवाज उठवला होता. खरी वस्तुस्थिती समोर आणली. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली गेली. दत्ता सामंत यांच्यावर टीका करण्याची हरी खोबरेकर आणि मंदार केणी यांची उंची नाही.आमदार वैभव नाईक हे खोबरेकर आणि केणी यांच्याकरवी सामंत यांच्यावर टीका करतात याच दत्ता सामंत यांना शिवसेनकडून अनेक आमिषे दाखवली गेली. मात्र, दत्ता सामंत हे नारायण राणेंचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी यापूर्वीच आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी धोंडी चिंदरकर यांनी केली आहे. निलेश राणे यांच्यावर कुडाळ मालवण मतदारसंघाची जबाबदारी आधीच पक्षाने दिली आहे. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत पक्षाला यश सुद्धा मिळाले आहे. शिवाय शहरासह ग्रामीण भागातील अनेक विषयात निलेश राणेंनी लक्ष घालून प्रश्न सोडवले आहेत. आज तालुकाध्यक्ष म्हणून बुथनिहाय फिरताना कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मागणी आमच्याकडे केली आहे. शिवाय आगामी सर्व निवडणुका या दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाव्यात अशीही कार्यकर्त्यांची इच्छा आहे असेही धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
