राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे झंजावाती नियोजन दौऱ्याचे प्रमुख प्रमोद जठार यांच्या आढावा बैठकांची जोरदार सुरुवात

*⚡कणकवली दि.११-:* कोकणचे नेतृत्व ना. नारायणराव राणे यांची जन आशीर्वाद यात्रा १९ ते २६ ऑगस्ट या काळात मुंबईपासून ते सिंधुदुर्गपर्यंत निघत आहे. या झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाला मिळालेले केंद्रीय मंत्रीपद, रोजगाराच्या क्षेत्रात कोकणच्या बेरोजगारांना उभे करू शकण्याची क्षमता असणारे मध्यम, लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रालय आणि कोकणातील सध्याची राजकीय स्थिती पाहता ही यात्रा प्रचंड जोशात आणि उत्साहात होणार हे निश्चित. या यात्रेच्या नियोजनाचे प्रमुख ही जबाबदारी पक्षाने महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद जठार यांच्यावर सोपवली आहे. कोकणातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यांच्यासह प्रमोद जठार यांनी जोरदार आढावा बैठका आयोजीत केल्या आहेत. यात्रेचे परिपूर्ण नियोजन करण्यासाठीच्या या आढावा बैठकांची १२ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या बैठकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता माणगाव रायगड येथून सुरुवात होणार आहे. दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, आम,नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासह नियोजनाची ही बैठक होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता चिपळूण येथे उत्तर रत्नागिरी विभागाची आढावा बैठक प्रमोद जठार यांच्यासह जिल्हाध्यक्ष विनय नातू, आम.नितेश राणे व प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. १३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे आढावा बैठक जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्यासह होत आहे. प्रमोद जठार, निलेश राणे व आमदार नितेश राणे या बैठकीत संगमेश्वर ते राजापूर या क्षेत्रातील यात्रेचा नियोजनात्मक आढावा घेणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक प्रहार भवन, कणकवली येथे होणार आहे. यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार, आम. नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, माजी आम. अजितराव गोगटे यांच्यासमवेत यात्रेच्या नियोजनाची चर्चा या बैठकीत होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दौऱ्याचा समारोप होत असून ना. राणे यांचे स्वागत शानदार व यादगार होईल असे नियोजन करण्यात येईल. १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वसंत स्मृती दादर येथे मुंबईची आढावा बैठक होत आहे. आ.सुनील राणे हे नारायणराव राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे सहप्रमुख असून मुंबईतील यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मुंबईतल्या या आढावा बैठकीला कार्यक्रम प्रमुख मा. प्रमोद जठार यांच्यासह प्रदेश सचिव निलेश राणे, आम. नितेश राणे, आम.सुनील राणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जन आशीर्वाद यात्रा १९ व २० ऑगस्ट रोजी मुंबई तसेच २१ ऑगस्ट रोजी वसई विरार येथे असणार आहे. वसई विरार येथील कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा दिनांक १७ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत घेतला जाईल. या बैठकीसाठी प्रमोद जठार, निलेश राणे, आम. नितेश राणे, आम.सुनील राणे, जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या उपस्थितीत आढावा घेतला जाणार आहे. एकूणच कोकणच्या राजकीय पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नाम. नारायणराव राणे यांचा दौरा हा झंजावाती ठरणार आहे. या दौऱ्यात खऱ्या अर्थाने जन आशीर्वाद प्राप्त करण्याच्या दृष्टीने नियोजन व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख प्रमोद जठार यांच्या आढावा बैठकांची सुरुवात माणगावपासून होत आहे.

You cannot copy content of this page