कोरोना महामारीमुळे रंगकर्मींचे होत असलेले हाल आणि कार्यक्रम बंदी मुळे होत असलेली उपासमार याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि रंगकर्मीच्या विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग” या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीमुळे विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते तर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी ८ दिवसाची मुदत दिली होती. मात्र रंगकर्मिच्या मागण्या बाबत कोणतीही दाखल घेतलेली नाही. याबाबत जिल्ह्यातील रंगकर्मी मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासाठीच ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून तीव्र संताप व्यक्त केला जाणार आहे अशी माहिती संघटक हार्दिक शिंगले यांनी दिली. तर याबाबत आज जिल्हाधिकारी याना निवेदन सादर करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी माहिती देताना हार्दिक शिंगले म्हणाले कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षात रंगकर्मींचा व्यवसाय ठप्प झाला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र या रंगकर्मीकडे शासनाने पाठ फिरवली आहे. कोणतेही सहकार्य किंवा आर्थिक मदत केली नाही. सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या आणि विविध कलागुणांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या रंगकर्मींची कोरोनामुळे कमाईची सर्वच दारे बंद झाली आहेत. अशावेळी शासनाने त्यांना आर्थिक आधार देणे आवश्यक होते. मात्र शासनाने रोजंदारीवर काम करणाऱ्या रंगकर्मीकडे पाठ फिरवल्याने व सर्वच कार्यक्रमवर बंदी घेतल्याने सिंधुदुर्गसह राज्यभरातील रंगकर्मी अस्वस्थ झाले आहेत. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील रंगकर्मीं एकजूट झाले असून जर रंगकर्मींच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशी मानसिकता निर्माण झाली आहे.त्यामुळे ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी आपल्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन केले जाईल . यामध्ये सिनेमा, मालिका, नाटक, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, पोवाडा ,लावणी, दशावतार, डोंबारी अशा विविध कला व लोककला सादर करणाऱ्या कलाकारांच्या सोबत वाद्य कलाकाराचा समावेश असणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या मागण्या आणि काही कायमस्वरूपी मागण्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत. या मागण्यामध्ये, एक पात्री किंवा दोन – तीन लोकांच्या मदतीने मोकळ्या जागेत होणाऱ्या कलाना तात्काळ परवानगी मिळावी, नियमांचे पालन करून नृत्य व संगीत क्लासेस चालु करण्याची परवानगी मिळावी, सर्व रंगकर्मींसाठी रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी, कोरोना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत रंगकर्मींना दरमहा ५ हजार इतका उदरनिर्वाह भत्ता मिळावा. या मागण्या बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय कला अकाडमी निर्माण करावी. महाराष्ट्रात विखुरलेल्या रंगकर्मीची शासनदरबारी नोंद करावी, माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी, या कायमस्वरूपी प्रमुख मागण्या व इतर मागण्या करण्यात येणार आहेत. अशी माहिती रंगकर्मी संघटनेचे संघटक हार्दिक शिंगले यांनी आज दिली.
रंगाकर्मींचे क्रांतीदिन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
