खिशातून पैसे खर्च करून काम करण्याची पद्धत काहींसाठी पोटशूळ

त्यामुळेच दत्ता सामंत यांच्यावर सुरू आहे टीका;खोबरेकर, केणीवर माजी नगराध्यक्ष आचरेकर बरसले

*⚡मालवण दि.०४-:* मालवणसह जिल्ह्यात जिथे लोकांवर अन्याय झाला तिथे दत्ता सामंतच उभे राहतात. तौक्ते वादळात देवबाग वासीयांच्या मदतीला धावून गेलेले दत्ता सामंत काहींना नुकसान भरपाई न मिळाल्याने अन्यायाला वाचा फोडत आहेत. दत्ता सामंत यांची काम करण्याची पद्धतच वेगळी असून स्वतःच्या पैशातून ते समाजासाठी करीत असलेले काम काहींना झोंबल्याने त्यांना पोटशूळ उठल्याची टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख श्री हरी खोबरेकर आणि नगरसेवक मंदार केणी यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत बोलताना केली. तौक्ते वादळात नुकसान झालेल्या देवबाग येथील ग्रामस्थ व मच्छीमाराना नुकसान भरपाई न मिळल्याबाबत भाजप नेते दत्ता सामंत यांनी मत्स्य अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत निवेदन दिले होते. याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व नगरसेवक मंदार केणी यांनी सामंत यांच्यावर टीका केली होती. यावर भाजपचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी मालवण पंचायत समिती येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यावेळी सुदेश आचरेकर हे बोलत होते. यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, तौक्ते वादळातील मालवण तालुक्यातील नुकसानग्रस्तांवर अन्याय झाला आहे. केवळ १५ टक्के लोकांना मदत मिळाली असून ८५ टक्के लोक मदतीपासून वंचित राहिले आहेत. देवबाग मधील नुकसानग्रस्त २२७ कुटुंबांपैकी फक्त ५७ जणांना मदत मिळाली. देवबाग मध्ये अनेकांचे नुकसान झाले असताना राजकीय लोकांनी हस्तक्षेप करून पक्षपातीपणे पंचनामे करून केवळ आपल्या संघटनेशी संबंधित लोकांना न्याय दिला. यात एकाच घरात लाखो रुपयांची मदत झाल्याचेही चित्र असून खऱ्या नुकसानग्रस्तांना मदत मिळालेली नाही. सगळा अंधाधुंदी कारभार सुरू असून आमदार, पालकमंत्री, खासदार यांचे याकडे दुर्लक्ष होत असून जनतेत असंतोष पसरला आहे. त्यामुळे या नुकसानी बाबत पुन्हा सर्व्हे होऊन संबंधितांना तात्काळ मदत मिळावी अशी आमची मागणी आहे, असे सुदेश आचरेकर म्हणाले. देवबाग मधील मदती पासून वंचित राहिलेल्या नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी त्याबाबत आवाज उठवला हे चुकीचे आहे का ? दत्ता सामंत यांच्यावर टीका करणारे वादळाच्या वेळी नुकसान ग्रस्तांपर्यंत पोहचले होते का ? दत्ता सामंत यांनी कोरोना काळातही लोकांना स्व:खर्चातून औषधे, सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले, अनेक रुग्णांचे प्राण वाचविले. सामंत यांच्यावर टीका करणारे स्वतःच्या संघटनेतील लोकांना वाचवू शकले नाहीत. दत्ता सामंत हे नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून ते राणेंचे खंदे व सच्चे समर्थक आहेत, त्यांच्या कार्यावर आरोप करणे चुकीचे आहे असेही सुदेश आचरेकर म्हणाले.

You cannot copy content of this page