जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर : सावंतवाडी शहराबरोबर बाजूच्या गावांचाही विकास होणार
*⚡बांदा दि.०३-:* संकेश्वर-बांदा हा महामार्ग म्हणजे सावंतवाडी शहराबरोबरच सावंतवाडी तालुक्यासाठी सुवर्णसंधी आहे. काही ठिकाणी नुकसान होईल परंतु भावी पिढीसाठी हा महामार्ग रोजगार देणारा ठरेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून निर्माण होणारा संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी मार्गेच व्हावा. तसेच सदर महामार्ग इन्सुलीतुन गेल्यास आम्ही त्याचे स्वागतच करू असे, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. संकेश्वर-बांदा महामार्ग म्हणजे सावंतवाडी शहराबरोबरच तालुक्यासाठी शेवटची सुवर्णसंधी असुन ही संधी आता आपण गमावु देता कामा नये. यासाठी शहरातील सर्वपक्षीयांनी एकत्र येत या महामार्गासाठी रिंग रोडची जागा लवकरात लवकर कशी संपादित करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण हा महामार्ग म्हणजे शहराची आणि शहराला लागून असलेल्या गावांची भरभराट करणारा मार्ग ठरणार आहे. एक महामार्ग शहराच्या आधीच बाहेरुन गेला त्यामुळे सावंतवाडी शहराला अगोदरच नुकसान सोसावे लागत आहे. हा महामार्ग सावंतवाडी शहरातुन गेल्यास शहरातील उद्योगधंदे-व्यापार वाढण्यास मदत होईल, त्याचबरोबर सावंतवाडी ते माजगाव-इन्सुली बांदा अशी मोठी बाजारपेठ तयार होणार आहे. काही ठिकाणी नुकसान होणार आहे परंतु येणाऱ्या भावी पिढीसाठी हा महामार्ग रोजगार देणारा ठरेल, अशी माहिती गुरुनाथ पेडणेकर यांनी दिली आहे.
