कणकवलीत ग्रामसेवक संवर्ग समुपदेशन बदलीवरून नाराजी

अन्यायग्रस्त ग्रामसेवक आणि संघटनेने मागितली सीईओंकडे दाद

*⚡कणकवली दि.०२-:* -कणकवली पं. स. तील तालुकांतर्गत समुपदेशन बदली प्रक्रियेत प्रशासकीय बदलीनंतर रिक्त होणारी ग्रामपंचायत तसेच विकल्प न दाखवता ग्रामसेवकांवर अन्याय केला असून याबाबत ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे दाद मागितली आहे. 30 जुलै रोजी कणकवली पं स अंतर्गत ग्रामसेवक संवर्गातील समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडली. कणकवली तालुक्यात प्रशासकीय बदलीसाठी 4 ग्रामसेवक व 1 ग्रामविकास अधिकारी पात्र होते. विनंती बदलीसाठी 2 ग्रामसेवक व एक ग्रामविकास अधिकारी कर्मचाऱ्याने अर्ज दाखल केला होता. 15 मे 2014 च्या समुपदेशन बदली बाबत च्या राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार प्रशासकीय बदलीनंतर रिक्त होणारी व सध्या रिक्त असलेल्या अशा एकत्रित सजा बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाखवणे बंधनकारक आहे. जेणेकरून बदलीस पात्र कर्मचारी त्याला योग्य ती सजा निवडू शकेल.मात्र 30 जुलै रोजी कणकवली तालुकांतर्गत झालेल्या ग्रामसेवक संवर्ग समुपदेशन बदलीवेळी राज्य शासनाचा 15 मे 2014 रोजीचा अध्यादेश डावलून केवळ प्रत्यक्ष रिक्त पदे दाखविण्यात आली. तसेच बदलीपात्र ग्रामसेवकांना कोणताही विकल्प देण्यात आलेला नाही. प्रशासनाने स्वतःच्या अधिकारात बदली नेमणूक केली . विनंती बदली प्रक्रियेत ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना रिक्त पदे दाखविताना वेगवेगळी कार्यपद्धती अवलंबण्यात आली. या अन्यायकारक बदली विरोधात ग्रामसेवक विकास बेळेकर, ग्रामसेवक एकनाथ चव्हाण, ग्रामसेवक नयना मिठबावकर, ग्रामसेवक मंगल बिलकुले यांनी जि.प. सीईओं कडे लेखी तक्रार केली आहे. तसेच ग्रामसेवक संघटना शाखा कणकवली च्या पदाधिकाऱ्यांनिही याबाबत जि.प.सीईओं कडे दाद मागितली आहे.

You cannot copy content of this page