मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केली मागणी
*⚡मालवण दि.०२-:* तौक्ते वादळात तडाखा बसलेल्या अनेक नुकसानग्रस्तांवर अन्याय झाला असून पंचनामे होऊनही त्यांना नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. यामध्ये घरांचे व झाडांचे नुकसान झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या नुकसानीचा पुन्हा सर्व्हे करून त्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. मालवण भाजप कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर हे बोलत होते. यावेळी आचरेकर म्हणाले, तौक्ते वादळात मालवणात अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. तर माड, आंबा कलमे यासह उत्पन्न देणारी अनेक झाडे कोसळली. उत्पन्न देणारी झाडे कोसळल्याने अनेकांचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन आर्थिक हानी झाली. वादळग्रस्तांना सरकारकडून मदत दिली गेली. मात्र ती मदत तुटपुंजी आहे. तसेच काहींचे मोठे नुकसान होऊनही चुकीचे पंचनामे झाल्याने अनेकांना पुरेशी मदत मिळाली नाही. तर काही ठिकाणी पंचनामे करताना व मदत देताना पक्षपातीपणा करण्यात आला आहे असा आरोप आचरेकर यांनी केला. तौक्ते वादळातील अनेक नुकसानग्रस्त नागरिक अजूनही मदतीपासून वंचित असताना सरकार झोपी गेले आहे का ? की सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. की पुरामुळे वादळ नुकसान भरपाईचे अनुदान पूरग्रस्तांकडे वर्ग केले गेले ? असे प्रश्न सुदेश आचरेकर यांनी उपस्थित केले. नुकसान भरपाईच्या याद्या प्रशासनाकडून दाखविल्या जात नाहीत. मदती पासून वंचित राहिलेल्यांच्या नुकसानी बाबत पुन्हा सर्व्हे करून तातडीने त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी आचरेकर यांनी केली आहे.
