चिपळूणच्या महापूरात निरंकारी सेवादलांचे सेवेसाठी योगदान

स्वयंसेवक खाकी वर्दीमध्ये करत आहेत बाधित घरांची, रस्त्यांची साफसफाई

*⚡कणकवली ता.०१-:* रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात महापुराच्या पाण्याने नुकसान केले आहे. शेकडो दुकानांसह घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून तेथील घरांची व रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या चिपळूण झोनच्या अंतर्गत रत्नागिरी क्षेत्रातील सेवादलांची तुकडी पाणी ओसरल्यानंतर खाकी वर्दीमध्ये सेवा करीत आहे. हे सेवाकार्य पूर्ण शहरातील बाधित नागरिकांच्या घरांची साफसफाई होईपर्यंत सुरू राहणार आहे. संत निरंकारी मंडळ गेली 90 वर्षाहून अधिक काळ मानवतेच्या कार्यात समरस राहून सर्वव्यापी निराकार परमेश्वराची ओळख समस्त मानवमात्राला देऊन खरा भक्तिमार्ग दाखवीत आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान देऊन रक्तदान, नेत्रदान, नेत्रचिकित्सा शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आपत्कालीन मदत इ.उपक्रम संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत आहे. संत निरंकारी मंडळाचे खाकी, निळी वर्दीमधील स्वयंसेवक विविध सेवाकार्यात समर्पित भावाने गुरुकार्याला प्राधान्य देऊन सेवा करतात. चिपळूणमध्ये झालेल्या महापुराच्या दुर्घटनेत चिपळूण शहरात पुराच्या पाण्याने शेकडो दुकानांसह घरांमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच संत निरंकारी मंडळाच्या संयोजक स्तरावरून जिल्ह्यातील निरंकारी भक्तांना चिपळूण येथील महापुराने प्रभावित नागरिकांसाठी मदतीची हाक दिली. या हाकेला प्रतिसाद देत निरंकारी भक्तांनी जमेल तशी मदत केली याबरोबरच जिल्ह्यातील नागरिक व सेवाभावी संस्था मिशन आधार यांनी निरंकारी मिशनच्या कार्यावर विश्वासाहर्ता दाखवली व संत निरंकारी मंडळाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. धान्य, बिस्किट बॉक्स आणि जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांसाठी जमा केल्या. चिपळुणचे प्रांत अधिकारी श्री. प्राविण पवार, तहसीलदार श्री. जयराम सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार संत निरंकारी मंडळ झोन क्र. ४० चे क्षेत्रीय प्रबंधक आदरनिय श्री. गंगाधर विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल विभागाचे क्षेत्रीय संचालक श्री उमेश भागडे हे निरंकारी सेवादलसह या परिसरातील बाधित रस्ते, गल्ली, घरे चिखलमुक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.या सोबतच निरंकारी मंडळाच्या माध्यमातून प्राप्त जीवनावश्यक साहित्याचे वाटपही येथील कुटुंबाना केले जात आहे.

You cannot copy content of this page