*⚡कणकवली दि.३१-:* चिपळूणमधील पूरपरिस्थिती ओसल्यानंतर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. या घाणीमुळे रोगाराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होतो. हा धोका लक्षात घेऊन गोपुरी आश्रमच्या स्वयंसेवकांनी चिपळूण गाठले आणि तेथील परिसराची स्वच्छता केली. ‘स्वच्छता आणि श्रमदान हीच खरी सेवा आहे’ हे संस्कार आप्पासाहेबांनी गोपुरी या आपल्या कर्मभूमीत रुजविले ते संस्कार आश्रमामध्ये आजही जिवंत असल्याचे उदाहरण आताच्या महापुरामध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांच्या मदतीवेळी पहावयास मिळाले. गोपुरी आश्रम कणकवली येथून थेट श्रमदानाच्या सेवेतून स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी 16 स्वयंसेवक झाडू, खोरी, घमेली, मांगेरे, कोयते, पाणी स्प्रे पंप इत्यादी आपले साहित्य घेऊन दोन दिवसांचा कार्यक्रम ठरवून 29 जुलै रोजी चिपळूणच्या दिशेने निघाले. सकाळी 10 वाजता चिपळूणला पोहोचल्यावर येथे मदतीसाठी कार्यरत असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली. चिपळूण शहरापासून 8 किलो मीटरवर नदीच्या काठावर असलेल्या दळवटणे या गावातील गणेशवाडीमध्ये जाऊन तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता मोहीम हाती घेतली. या आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये साधारणतः 5 फूट पाणी आतमध्ये शिरले होते. आतमधील सर्व साहित्य, कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली होती व पाऊलभर चिखल आत होता. गोपुरीच्या सर्व स्वंयसेवकांनी आतमध्ये जाऊन टेबल, खुर्च्या, भांडी व अस्ताव्यस्त पडलेलं सर्व साहित्य बाहेर काढलं आणि आतील सगळा साचलेला गाळ, चिखल बाहेर काढला. त्यानंतर पाणी प्रेशर पंपाच्या साहाय्याने संपूर्ण इमारत स्वच्छ करून दिली. त्यानंतर येथील नदी किनारी बाजूलाच राहत असलेल्या गणेश वाडीतील अब्दुल महिद फकिर कळवेकर व त्यांच्या पत्नी दोघेच वयोवृद्ध राहत होते. त्यांच्या घरात अगदी ढोपरभर चिखल व त्यातच सर्वत्र चादरी, अंथरूण, टोप, भांडी पडलेली होती तेथे जाऊन त्यांच्या घरातील साचलेला गाळ बाहेर काढून साफ सफाई करून दिली. अशाप्रकारे दिवसभराची स्वच्छता मोहीम पूर्ण करून सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे राष्ट्र सेवा दल मदत केंद्राच्या ठिकाणी मुक्काम केला. दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजता तांबटआळी येथील नुकसान झालेल्या गरजू कुटुंबांना भेट देऊन त्यांना अन्नधान्य व कपडे इत्यादी साहित्य वाटप केले. त्यानंतर मुरादपुर येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये साफसफाई करण्यासाठी पोहोचलो. या इयत्ता 7 वीपर्यंतच्या शाळेचे खूप नुकसान झाले होते. शाळेत जवळपास 15 ते 16 फूट पाणी आतमध्ये आले होते. शाळेतील एकूण 7 खोल्या व पुढचा व्हरांडा संपूर्णपणे चिखलमय झाला होता. सर्व टेबल, खुर्च्या, बँच, संगणक, टिव्ही, कपाट हे साहित्य पूर्ण चिखलाने भरले होते. गोपुरीच्या या स्वयंसेवकांनी बाहेरील व्हरांड्यापासून चिखल काढायला सुरुवात करत करत सर्व खोल्यामधील चिखल काढून पाण्याने स्वच्छ धुऊन घेतल्या. त्यानंतर सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन व्यवस्थितरित्या लाऊन ठेवले. 2 दिवसांच्या आयोजनाप्रमाणे चिपळूणमधील या महाभयानक संकटामध्ये श्रमदान रुपी सेवा करून कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचा स्वछतेचा वसा पुढे अविरत चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गोपुरी आश्रमाच्या या स्वयंसेवकांमध्ये कणकवली तालुक्यातील महेश कोेदे, बाळू मेस्त्री, परेश परुळेकर, रमेश पवार, रोहित खारकर, परेश वाळके, अभिषेक चव्हाण, व्यंकटेश सावंत, मंगेश नेवगे, बाबू राणे, विराज राणे, अक्षय मुळये, संतोष राणे, बाळा पोईपकर, संदीप सावंत व जयवंत सावंत हे कार्यकर्ते सहभागी होते.
गोपुरीच्या स्वयंसेवकांनी चिपळूणमध्ये जात राबवली स्वच्छता मोहीम; पूरग्रस्तांनी मानले आभार
