जिल्हाधिकाऱ्याना देणार निवेदन हार्दिक शिगले यांची माहिती
*💫ओरोस दि.२८-:* कोरोना महामारीमुळे रंगकर्मींचे मोठे हाल झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि रंग करण्याच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे या निवेदनातील मागण्या बाबत आठ दिवसात दखल न घेतल्यास ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडन्यात येणार असल्याची माहिती रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र सिंधुदुर्ग संघटक हार्दिक शिंगले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गेल्या दीड वर्षात कोरोणा महामारीमुळे विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत आज रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने संघटक हार्दिक शिंगले यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी सागर सारंग, राजू धारपवार, कल्पना बांदेकर, महेश जांभोरे ,गजेंद्र कोठावळे, कौस्तुभ नाईक, तुषार बांदेकर, नाना कांबळे, आदी पदाधिकारी (रंगकर्मी) उपस्थित होते. यावेळी माहिती देताना हार्दिक शिंगले म्हणाले कोरोणा महामारीमुळे गेल्या दीड वर्षात रंगकर्मींचा व्यवसाय ठप्प झाला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र या रंगकर्मीकडे शासनाने पाठ फिरवली आहे. कोणतेही सहकार्य किंवा आर्थिक मदत केली नाही. सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या आणि विविध कलागुणांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या रंगकर्मींची कोरोनामुळे कमाईची सर्वच दारे बंद झाली आहेत. अशावेळी शासनाने त्यांना आर्थिक आधार देणे आवश्यक होते. मात्र शासनाने रोजंदारीवर काम करणाऱ्या रंगकर्मी कडे पाठ फिरवल्याने सिंधुदुर्गसह राज्यभरातील रंगकर्मी अस्वस्थ झाले आहेत. मात्र आता राज्यभरातील सर्व क्षेत्रातील रंगकर्मीं एकजूट झाले असून जर रंगकर्मींच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. आपल्या हक्कासाठी तीव्र आंदोलन केले जाईल असेही यावेळी सांगितले यामध्ये सिनेमा, मालिका, नाटक,या क्षेत्रातील कलाकारां सोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, पोवाडा ,लावणी, दशावतार, डोंबारी अशा विविध लोककला सादर करणाऱ्या कलाकारांच्या सोबत वाद्य कलाकाराचा समावेश असणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या मागण्या आणि काही कायमस्वरूपी मागण्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. या निवेदनातून एक पात्री किंवा दोन – तीन लोकांच्या मदतीने मोकळ्या जागेत होणाऱ्या कलाना तात्काळ परवानगी मिळावी, तसेच या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी. नियमांचे पालन करून नृत्य व संगीत क्लासेस चालु करण्याची परवानगी मिळावी, महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी, कोरोना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत रंगकर्मींना दरमहा ५ हजार इतका उदरनिर्वाह भत्ता मिळावा. या मागण्या बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय कला अकाडमी निर्माण करावी. महाराष्ट्रात विखुरलेल्या रंगकर्मीची शासनदरबारी नोंद करावी, माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी, या कायमस्वरूपी प्रमुख मागण्या व इतर मागण्या निवेदनातून करण्यात येणार आहेत. अशी माहिती आज हार्दिक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
