शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऐवजी ९ ऑगस्टला

शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती

कोरोना प्रादुर्भावमुळे २०२०-२१ च्या अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या पूर्व व उच्च प्राथमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार होत्या. मात्र, आता ही परीक्षा ९ ऑगस्ट रोजी होणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी दिली. तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सबंधित शाळांच्या लॉगिंगला २७ जुलै रोजी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी च्या परीक्षा फेब्रूवारी २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेतल्या जातात. यावर्षी या परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु कोरोना प्रादुर्भावमुळे ही परीक्षा होवू शकली नव्हती. त्यामुळे शासनाने ३० मार्च २०२१ रोजी पत्र काढत ही परीक्षा २३ मे २०२१ घेण्यास मान्यता दिली होती. परंतु पुन्हा कोरोनामुळे ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा ८ ऑगस्ट रोजी कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यास शासनाने मान्यता दिली होती. तसे पत्र राज्य शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांचे प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. मात्र, आता ही परीक्षा शासनाने एक दिवस पुढे ढकलली असल्याचे आंबोकर यानी सांगितले.

You cannot copy content of this page