ऐश्वर्य मांजरेकर याच्या तत्परतेमुळे होतेय कौतुक
*💫मालवण दि.२६-:* मालवण एसटी स्टँड येथे सापडलेली महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी ऐश्वर्य मांजरेकर या युवकाने जागरूकता दाखवत सुकळवाड येथील चंद्रशेखर सावंत यांना परत केली. त्याच्या या कार्यतत्परतेबाबत कौतुक होत आहे.
मालवण शहरातील एसटी स्टँड येथे चंद्रशेखर वासुदेव सावंत (रा .सुकळवाड राऊळवाडी) यांची पिशवी हरवली होती. सदर पिशवी मध्ये त्यांची महत्वाची कागदपत्रे होती . येथील युवक ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर याला सदर पिशवी बस स्टँड नजीक रस्त्यावर पाण्यात पडलेली आढळली. त्याने पिशवी घरी आणून आतील कागदपत्रे सुकवून सावंत यांच्या आधारकार्ड वरील मोबाइल नंबर द्वारे त्यांना संपर्क केला. त्यांनी लगेचच शहानिशा करून पिशवी आपली असल्याचे सांगितले. ऐश्वर्य मांजरेकर याच्या तत्परतेमुळे कागदपत्रे परत मिळाली तसेच कागदपत्रे हरवली असती तर कागदपत्रे पुन्हा काढण्यासाठी लागणारा वेळ व पैसा वाचला अशी भावना चंद्रशेखर सावंत यांनी व्यक्त करत ऐश्वर्य याचे आभार मानले. ऐश्वर्य मांजरेकर याच्या कार्यतत्परतेबाबत मालवण शहरात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे .
