प्रशासनासमोर कठीण आव्हान : खालच्या दिशेने सोमवार पासून शोध मोहीम
*💫बांदा दि.२५-:* गाळेल येथे दरडीत अडकलेल्या ‘त्या’ युवकाचा शोध घेण्यात रविवारी दुसर्या दिवशीही शोध पथकाला अपयश आले. रविवारी दोन जेसीबी व दोन पोकलँड या मोहिमेसाठी कार्यरत होते. बांधकाम विभागाच्या रस्ता नकाशावरुन केवळ रस्त्यावरील माती हटविण्यात यश आले. रस्त्यापासून खाली सुमारे १०० मीटरपर्यंत दरडीची माती कोसळल्याने त्या युवकास शोधण्याचे कठीण आव्हान प्रशासना समोर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगराची खाली आलेली माती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान आहे. चिखलामुळे शोध मोहीम राबविण्यात अडचणी येत आहेत. सध्या बांधकाम विभागाच्या रस्ता नकाशावरुन रस्त्याचे टोक मिळाले आहे. त्याच्या खालच्या दिशेने सोमवार पासून शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, महसुल मंडळ अधिकारी आर. व्ही. राणे, तलाठी वर्षा नाडकर्णी हे सर्व परस्थितीचा आढावा घेत अाहेत. मृतदेह त्याच ठिकाणी दाबला जाऊ शकतो किंवा तो मातीच्या ढिगार्याबरोबर पुढेही सरकू शकतो. सोमवारी सकाळ पासून पुन्हा शोध मोहिमेला सुरवात करण्यात येणार आहे. सदर ढिगार्याखाली अडकलेला युवक वेंगुर्ले तालुक्यातील मठ या गावाचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यानुसार मठ येथील स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. गाळेल व डिंगणे येथील स्थानिकांनीही प्रशासनाच्या मदतकार्यात सहभाग घेतला होता.
