जीवनावश्यक वस्तू प्रत्यक्ष भेट देत केल्या सुपूर्द
*💫मालवण दि.२५-:* सावंतवाडी तालुक्यातील बांदा इन्सुली येथे आलेल्या पुरात अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची तातडीने गरज असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन मालवण मधील मच्छीमार बांधवानी जीवनावश्यक वस्तू गोळा करून बांदा व इन्सुली येथे प्रत्यक्ष पूरग्रस्त कुटुंबाना ही मदत सुपूर्द केली. यामुळे पूरग्रस्त कुटुंबाना काहीसा दिलासा मिळाला आहे. बांदा व इन्सुली येथे आलेल्या पुरामुळे बाजारपेठ तसेच घरादारांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाल्याने अशा वस्तूंची या नागरिकांना तातडीची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन मालवणच्या मच्छीमार बांधवानी एकमेकांच्या सहकार्यातून पूरग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव केली. तांदूळ, तेल, चहा पावडर, साखर, टूथपेस्ट, बिस्कीट पुडे, कपडे आदी विविध प्रकारच्या वस्तू जमा करत मच्छीमार बांधवानी बांदा व इन्सुली येथे जाऊन प्रत्यक्ष पूरग्रस्त कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांना ही मदत सुपूर्द केली. बांदा येथील ५० कुटुंबे तर इन्सुली येथील ७६ कुटुंबांना ही मदत सुपूर्द करण्यात आली. ही मदतीच्या वाहतुकीसाठी बाळू मिटकर यांनी विना मोबदला आपली गाडी उपलब्ध करून दिली. या मदत कार्यात मच्छीमार समाजाचे अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, भाई जाधव, संमेश परब, चंदू मयेकर, रोहित पालव, अंकित धुरी, प्रथमेश बिरमोळे आदी सहभागी झाले होते.
