तेर्सेबांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांची मागणी_
*💫कुडाळ ता.२५-:* तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त मालमत्तांची त्रयस्थ कर्मचाऱ्यांमार्फत फेर चौकशी करून सत्यता पडताळणी केल्याशिवाय तेर्सेबांबर्डे येथील त्या अकरा नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत अदा करू नये, अशी मागणी तेर्सेबांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे. या विषयी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचे परब त्यांनी स्पष्ट केले. प्रसिध्दी पत्रकात परब यांनी म्हटले की, तोक्ते वादळामुळे तेर्सेबांबर्डे गावात नुकसान झालेल्या घर, गोठे, मांगर अशा प्रकारच्या मालमत्तेची पंचयादी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेदभाव करून केली आहे. ही पंचयादी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्वतः च्या नजर पाहणीनुसार करणे आवश्यक होते. मात्र तेर्सेबांबर्डे गावात एकूण अकरा घरांची अंशतः नुकसान झाल्याचे पंचनामे बनविले. पण प्रत्त्यक्षात नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे का करण्यात आले नाहीत, ज्या इमारतींच्या पडझडीस तोक्ते वादळाचा काहीही संबंध नाही तसेच काही वर्षांपासून ज्या घरात वास्तव्य नाहीत ती घरे नादुरूस्त होती, त्या घरांचा संबंध तोक्ते वादळाशी जोडण्यात येऊन शासनाची फसवणूक केली आहे. मात्र प्रत्यक्षात तोक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे का टाळण्यात आले, याची चौकशी व्हावी. सध्या झालेल्या पंचयादीत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल आहे. त्यामुळे या पंचयादीची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. महसूलच्या नियुक्त अधिकाऱ्यांनी केलेली पंचयादी संशयास्पद आहे. ज्यांना खरोखरच मदत मिळणे अपेक्षित आहे. त्यांचा भ्रमनिरास करण्यात आला आहे. त्यामुळे केलेली यादी ही राजकीय यादी आहे की खरोखरच नुकसानीची यादी आहे याची त्रयस्थ कर्मचाऱ्यांमार्फत फेर चौकशी करून सत्यता पडताळणी करणे आवश्यक आहे. म्हणूनच स्थानिक पातळीवर आसपासच्या परिसरातील रहिवाशांना विश्वासात घेऊन गोपनीय चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असेही परब यांनी स्पष्ट केले.
