रस्त्यावर आले पाणी; सखल भागातील दुकाने धोक्यात
*💫कणकवली दि.१८-:* गेले तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर आज पुन्हा वाढविल्याने दुपारपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने कणकवली शहरातील नाले आणि गटारे पूर्ण भरले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी आले आहे त्यामुळे नागरिकांना वाहतूक करणे मुश्कील बनले आहे. कणकवली येथील रामेश्वर प्लाझा कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्याची स्थिती निर्माण झाली असून संजीवनी हॉस्पिटलकडून जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले असल्याने नागरिकांचा मार्ग बंद झाला आहे. त्याचप्रमाणे कणकवली एसटी स्टँड समोरील अनिल हेअर ड्रेसर्स येथे पाणी साचले असल्याने दुकानात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कणकवलीत आज दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते .पावसाचा जोर कमी होत नसल्याने नागरिकांनी आज घरातच थांबणे पसंत केले तसेच रविवार असल्याने बाजारातही गर्दी तुरळक प्रमाणात होती त्यातच पावसाचा जोर वाढत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. कणकवली शहरातील गटारे पूर्णपणे भरल्याने या गटाराबाहेर पाणी आले असल्याने रस्त्यावर पाणी साचले होते .त्यामुळे नागरिकांना वाहतूक करणे मुश्कील बनले होते त्याचबरोबर सखल ठिकाणच्या भागांमध्ये पाणी शिरले असून पाणी दुकानाचे नुकसान होण्याची स्थिती निर्माण झाली होती.
