रोजगारासंदर्भात सरपंच अक्रम खान यांनी वेधले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष
*💫बांदा दि१७-:* गोव्यात रोजगारासाठी जाणारा तरुण वर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबावा यासाठी बांदा ते दोडामार्ग हा ‘औद्योगिक कॉरिडॉर’ करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. बांदा सरपंच अक्रम खान यांनी राणे यांनी दिल्ली येथे भेट घेत केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यावेळी खान यांनी तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी स्थानिक पातळीवर उद्योगधंद्यांची निर्मिती करण्याकरिता मंत्री राणे यांचे लक्ष वेधले. श्री. खान यांनी बोलताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० हजारहून अधिक तरुण, तरुणी रोजगारासाठी गोवा राज्यावर अवलंबून आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या सीमा बंद असल्याने याचा सर्वाधिक फटका हा नोकरदारांना बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण जिल्ह्यातच थांबण्यासाठी येथील उद्योग प्रकल्पांना चालना देण्याची मागणी खान यांनी केंद्रीय मंत्री राणे यांच्याकडे केली. मंत्री राणे म्हणाले की, बांदा, दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी परिसरातील सर्वाधिक तरुण नोकरीसाठी गोव्यात ये-जा करतात. यासाठी बांदा ते दोडामार्ग हा पट्टा औद्योगिक प्रकल्पांनी विकसित करण्याचा आपला विचार आहे. याच दृष्टिकोनातून आडाळी येथे एमआयडीसीची पायाभरणी करण्यात आली आहे. भविष्यात खासगी उद्योजकांच्या माध्यमातून उद्योग निर्मिती करण्याचे आश्वासन मंत्री राणे यांनी खान यांना दिले. यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर उपस्थित होते. यावेळी खान व तोरसकर यांनी केंद्रीयमंत्री राणे यांना पुष्पगुच्छ व श्री बांदेश्वर यांची प्रतिमा भेट देऊन अभिनंदन केले.
