जनतेची लूट करण्यासाठीच नाणार प्रकल्प :प्रा.महेंद्र नाटेकर
*💫कणकवली दि.१६-:* नाणार येथे येऊ घातलेल्या विनाशकारी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याने तो अन्य गावात न्यावा यासाठी अनेक ग्रामपंचायती तसेच नगरपालिका आपल्या गावात न्यावा असे ठराव करुन शासनाकडे मागणी करीत आहेत.रत्नागिरीमध्ये हा प्रकल्प होत नसेल तर तो रायगड , किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये व्हावा अशीही राजकीय पक्ष मागणी करीत आहेत.रिफायनरीमुळे सर्व कोकणच उध्वस्त होणार असल्याने त्यांच्या ह्या मागण्या अज्ञानमूलक व हास्यास्पद आहेत , असे स्वतंत्र कोकणचे अध्यक्ष प्रा . महेंद्र नाटेकर यांनी ठोस प्रतिपादन केले आहे. स्वतंत्र कोकणची बैठक येथील सांस्कृतिक भवनमध्ये घेण्यात आली होती , त्यावेळी प्रा . नाटेकर बोलत होते. यावेळी मोतिराम गोठिवरेकर , ए.वाय.चिलवान , वाय . जी . राणे , जे.जे.दळवी , प्राचार्य धनसे इत्यादी उपस्थित होते . प्रा.नाटेकर पुढे म्हणाले आखाती देशातून सुमारे सहाशे मेट्रिक टन कच्चे तेल आयात करुन त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातून पेट्रोल , डिझेल , विमानाचे इंधन तयार केले जाईल.वार्षिक सहा कोटी टनाची जगातील ही सर्वात मोठी रिफायनरी असेल.प्रकल्पासाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारुन दररोज अठरा हजार टन कोळसा जाळून तेल शुध्दीकरण केले जाईल.त्यातून सहाशे टन राख निर्माण होऊन ती सर्वत्र पसरुन प्रचंड प्रदूषण वाढणार आहे . ह्या रिफायनरीतून दर वर्षी कोट्यावधी मेट्रिक कार्बनडायऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड बाहेर पडून ते संपूर्ण कोकण व्यापून टाकतील.रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या वायुप्रदुषणामुळे सजीव सृष्टीवर घातक परिणाम होतात.हे माहूल , मथुरा , कोची , विशाखापट्टणम , मंगलोर इत्यादींच्या रिफायनरी अहवालातून स्पष्ट झाले आहे . ह्या अहवालानुसार कर्करोग , हृदयविकार मज्जा संस्थांवर घातक परिणाम , दमा , श्वसनाचे त्रास होऊन संपूर्ण मानवी जीवनच उध्वस्त होते हे सिध्द झाले आहे . माहूल, मथुरा इत्यादी छोट्या रिफायनरीमधून एवढा विनाश होतो तर जगातील सर्वात मोठ्या सहा कोटी टनाच्या नाणार येथील रिफायनरीमधून किती विनाश होईल याची कल्पनाही करवत नाही. विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कोणालाच नको असतो . त्याला कोणीही जमीन देत नाही . म्हणून मोदी , शहा इत्यादी व्यापाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होणार हे केंद्र शासनाकडून गुप्तरुपाने समजल्याने नाणार येथील शेकडो एकर जमीन कोडीमोलाने खरेदी केली . जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कौडीमोलाने खरेदी केलेली जमीन शेवटी दीड कोटी रुपये एकरी गेली . हे उदाहरण राजकारण्यांसमोर होते.त्या दृष्टिने गोरगरिबांना शेकडो एकर जमीन त्यांनी खरेदी केली . त्यातून त्यांना कोट्यावधी रुपयांचा लाभ होईल असा त्यांचा कयास आहे . आणि म्हणून नाणार येथील तरुणांना हाताशी धरुन नाणार येथेच रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यासाठी आंदोलने करीत आहेत.शासनावर विरोधी पक्ष दबाव आणीत आहेत.नाणार येथील प्रकल्प झाल्यास एक लाख नोकऱ्या उपलब्ध होतील अशी दिशाभूल करुन लोकांना भडकावीत आहे.कोकणात शासकीय नोकऱ्या ५ % नोकऱ्याही कोकणी लोकांना मिळत नाहीत . कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प होत नसेल तर आम्ही तो विदर्भ , मराठवाड्यात नेतो अशा धमक्या विरोधी पक्ष देत आहेत . हा फक्त दिखावा विदर्भात प्रकल्प नेत आहेत मग तो चांगला आहे असे असल्यानेच नेत आहेत मग कोकणात का नको अशी विरोधकांची ही राजकीय खेळी आहे . असे शेवटी नाटेकर म्हणाले .
