घोणसरी येथील शोकसभेत वाहिली श्रद्धांजली
*💫कणकवली दि.१३-:* कोविड – १९ वैश्विक महामारीच्या काळात सन २०१९ आपल्या संस्थेची इमारत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड सेंटर उभारण्यासाठी शासनाला मोफत उपलब्ध करून देणारे जिल्ह्यातील पहिले व्यक्ती नामदेवराव मराठे होते. तसेच त्यांच्या निस्वार्थी कार्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे.गोरगरीबांचा कैवारी, समाजाची, जिल्ह्याची प्रगती व्हावी म्हणून अविरत झटणाऱ्या त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा, असे उद्गार उपस्थितांनी काढत नामदेवराव मराठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. घोणसरीचे उद्योगपती तथा ब्राम्हणेश्वर सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक नामदेवराव मराठे यांचे ८ जुलै २०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानिमित्त नुकतीच घोणसरी विद्यालयात सभेचे आयोजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेस जि. प. सदस्य संजय आग्रे, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, घोणसरी ग्राम विकास मंडळाचे उपाध्यक्ष रामकृष्ण देवलकर, शालेय समितीचे चेअरमन राजेंद्रराव राणे, सामाजिक कार्यकर्ते राजू राणे, माजी सरपंच मॅक्सी पिंटो, प्रशालेचे मुख्याध्यापक तावडे, शांताराम राणे, इंदुलकर, आबू येंडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, के. मराठे यांच्या कार्याचा आढावा उपस्थितांना देण्यात आला. तर खेड्यापाड्यात गोरगरिब शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीचे शात्रशुद्ध शिक्षण मिळावे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडाघाट येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. आज येथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही विद्यार्थी येऊन शिक्षण घेत आहेत. स्वतः झिजून इतरांना चंदनाप्रमाणे सुगंध देणारी ही दानशूर व्यक्ती होती. कुठे गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कर, गोरगरीबांना घरे बांधून दे, क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यास त्यांना पारितोषिक देवून गौरव करणे हा त्यांचा स्वभाव होता.असेही यावेळी श्रद्धांजली वाहताना मान्यवरांनी उद्गार काढले.
