व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांचे उदगार;केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांचेही केले अभिनंदन
मालवण (प्रतिनिधी) केंद्र सरकारने किरकोळ व्यापार क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेऊन व्यापाऱ्यांची मागील कित्येक दशकांची मागणी पुर्ण करून देशभरातील कोट्यावधी छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. छोट्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा महत्वपुर्ण निर्णय होत असतानाच त्याच्या अंमलबजावणीची धुरा लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री म्हणून आता कोकणचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री ना. नारायण राणे यांच्या समर्थ खांद्यावर सोपविण्यात आल्याने सिंधुदुर्गातील तमाम व्यापार क्षेत्राच्या दृष्टीने हा दुग्धशर्करा योग आहे, अशी भावना सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त करत ना. राणे यांचे निवेदनाद्वारे अभिनंदन केले आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि आता केंद्रीय मंत्री अश्या चढत्या श्रेणीतील आजवरच्या धडाडीच्या विकासात्मक कार्यशैलीच्या अनुभवाच्या बळावर ना. नारायण राणे हे केंद्रीय मंत्रीपद देशभरातील समस्त व्यापार-उद्योग वर्गाच्या विकासासाठी सार्थकी लावतील, याची खात्री आहेच. सिंधुदुर्गातील व्यापार-उद्योग क्षेत्राच्या वेगवान विकासासाठी व्यापारी महासंघ पुर्ण ताकदीने सदैव ना. राणेंच्या सोबत राहील, असेही प्रसाद पारकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
