*💫मालवण दि.०६-:* तारकर्ली एमटीडीसी येथून पर्यटकांचा मोबाईल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी पवन नामदेव कुसाळे (वय २९) रा. शांतीउद्यान आपटे नगर कोल्हापूर याला आज पोलिसांनी मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले. तारकर्ली एमटीडीसी येथे २ मार्च २०२१ रोजी पर्यटन सफरीवर आलेल्या नाशिक येथील पर्यटक शेखशोएब शेख सलीम (रा. दरेगाव मालेगाव नाशिक) सॅमसंग कंपनीचा १८ हजार किंमतीचा मोबाईल ३ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चोरीस गेला होता. समुद्र किनारी असलेल्या गजीबो (लाकडी तंबू) येथून मोबाईल चोरीस गेला होता. याप्रकरणी ४ मार्च रोजी शेखशोएब यांनी मालवण पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली. त्यानुसार मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस एस शिवगण तपास करत होते. चोरीस गेलेल्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात आले. मोबाईल लोकेशन कोल्हापूर येथे दिसून आले. प्राप्त लोकेशन नुसार मालवण पोलिसांचे पथक शिवा शिवगण व धोंडू जानकर हे सोमवार ५ जुलै रोजी कोल्हापूर येथे दाखल झाले. मोबाईल चोरी प्रकरणी संशयित पवन नामदेव कुसाळे वय २९ रा. शांती उद्यान आपटे नगर कोल्हापूर याला ताब्यात घेतले. मंगळवार ६ जुलै रोजी संशयित पवन याला मालवण पोलीस ठाणे येथे आणून चौकशीअंती अटक करण्यात आली. चोरीस गेलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केला. पवन कुसाळे याला मालवण पोलिसांनी मंगळवारी दुपारी मालवण न्यायालयात हजर केले. मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.बी चौहान यांनी संशयित आरोपीस रू १५ हजाराचा जामीन मंजूर केला आहे.
मोबाईल चोरट्याची पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता
