मालवण दि प्रतिनिधी उठ ओबीसी उठ, आणि वळव तुझी वज्रमूठ… ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा प्रकारचे फलक हाती घेऊन राज्य शासनाकडून रद्द झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे या मागणीसाठी भंडारी समाज महासंघातर्फे भंडारी समाज बांधवांनी आज गाढव नाका भांडुप पश्चिम मुंबई येथे मूकमोर्चा काढण्यात आला. शासनाने ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण न दिल्यास यापुढे व्यापक आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी भंडारी समाजाच्या नेत्यांनी दिला. शासनाकडून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे या मागणी साठी भंडारी समाज आंदोलन उभे करत आहे. या पार्श्वभूमीवर भंडारी समाज महासंघातर्फे मुंबईमध्ये भांडुप पश्चिम येथे मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चास ओबीसी सेल अध्यक्ष नरेंद्र गावकर, ओबीसी नेते गुरुनाथ मिठबावकर, भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष तुषार कांबळी, सचिव संजय पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष रवी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ओबीसी सेलचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांनी ओबीसी आरक्षण परत मिळविण्या साठी केवळ भंडारी समाज नाही तर या ओबीसीमधील सर्व जातीच्या बांधवांनी एकत्र येऊन शासनाच्या या निर्णयास विरोध करून आंदोलन छेडले पाहिजे, असे सांगितले. तर गुरुनाथ मिठबावकर यांनी आम्ही ओबीसी साठी नवे आरक्षण न मागता शासनाने जे राजकीय आरक्षण रद्द केले आहे तेच पुन्हा मागत आहोत, जोपर्यंत आरक्षण पुन्हा मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. या लढ्यासाठी सर्व ओबीसी जातींनी एकत्र यावे असे आवाहनही गुरुनाथ मिठबावकर यांनी केले . यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
भंडारी आरक्षणासाठी समाजाचा भांडुप येथे मुकमोर्चा
