शिक्षकांनी दक्ष व सक्षम रहावे;मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांचे आवाहन
*💫मालवण दि.०५-:* कोरोना महामारीमुळे शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात अमलात आले असून ही महामारी ओसरल्या नंतरही पुढील शिक्षण पद्धतीचे स्वरूप वेगळे असणार आहे. त्यामुळे शिक्षकांनीही स्वतःमध्ये बदल घडवून दक्ष व सक्षम रहावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व हडी गावचे सुपुत्र डॉ. सुहास पेडणेकर यांनी मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात बोलताना केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांनी मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन तंत्रज्ञानामुळे शिक्षण पद्धतीत झालेले बदल व त्या अनुषंगाने शिक्षकांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत मुंबईतील रुईया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अनुश्री लोकूर, डॉ. सोनाली पेडणेकर, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर, सेक्रेटरी गणेश कुशे, डॉ. शशिकांत झाटये, प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, साईनाथ चव्हाण, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, प्रा. आर.एन. काटकर आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्या डॉ. सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवावे लागेल याचा आपण सर्वांनी कधी विचारही केला नव्हता. मात्र, कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर पर्याय म्हणून आज विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवावे लागत आहे. परीक्षा देखील ऑनलाइन घेतल्या जात आहेत. यापूर्वी आपण शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करीत होतो. मात्र, कोरोनामुळे शिक्षणात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात अमलात आले आहे. या दृष्टीने शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल घडविणे आवश्यक आहे. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षक म्हणून तंत्रज्ञान अंगिकारले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण कसे देतात हे शिक्षक म्हणून आपणास कळले पाहिजे. भविष्यात कोरोनाची स्थिती निवळली तरी शिक्षणाचे स्वरूप हे वेगळे राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी जबाबदारी ओळखून त्या दृष्टीने सक्षम बनावे, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना डॉ. पेडणेकर म्हणाले, केवळ परीक्षा घेणे हे विद्यापीठाचे काम नसते. त्याचबरोबर संशोधन व अन्य काही महत्त्वपूर्ण बाबींवर काम करणे ही देखील विद्यापीठाची जबाबदारी असते. मुंबई विद्यापीठाकडे ८०० हून अधिक महाविद्यालये संलग्न आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर असते नजीकच्या काळात डीग्री ग्रेडींग कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पदवी देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यायाची असणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांना आपला दर्जा सुधारणे आवश्यक आहे. नॅक कमिटीला समोरे जाताना महाविद्यालयाने राबविलेल्या उपक्रमाचे पुरावे जतन करणे आवश्यक आहे. यावेळी उपस्थित प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांचे कुलगुरू डॉ. पेडणेकर यांनी निरसन केले. मुंबईतील रुईया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अनुश्री लोकूर, व डॉ. सोनाली पेडणेकर यांनीही उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करीत प्रश्नांचे निरसन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक बी.एच. चौगुले यांनी तर आभार प्राध्यापक डॉ. सुमेधा नाईक यांनी मांडले.
