मालवण प स चा विद्यालय ऍप स्तुत्य उपक्रम

संजना सावंत यांनी केली स्तुती; मुलांचे शैक्षणिक नुकसान टळण्यास मिळाली मदत

मालवण (प्रतिनिधी) गेल्या दीड वर्षात कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मालवण पंचायत समितीने गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालय अँप स्वाध्यायमालेचा राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी आज मालवण येथे केले. मालवण पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विद्यालय अँप स्वाध्यायमाला उपक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय माने, विस्तार अधिकारी उदय दीक्षित, गटनेते सुनील घाडीगावकर, अशोक बागवे, विनोद आळवे, कमलाकर गावडे, सोनाली कोदे, निधी मुणगेकर, मनीषा वराडकर, मधुरा चोपडेकर, छाया परब यांच्यासह तज्ज्ञ शिक्षक उपस्थित होते. यावेळी गतवर्षी राबविलेल्या उपक्रमात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सौ. सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सौ. सावंत म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे मुलांना शाळेत पाऊल टाकता आलेले नाही. परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच ते शिक्षणाच्या प्रवाहात राहावे या उद्देशाने मालवण पंचायत समितीने स्वाध्यायमालेचा राबविलेला उपक्रम उल्लेखनीय असा आहे. गतवर्षी राबविलेल्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यात मुलांनी मिळविलेले यश पाहता या काळातही त्यांचा बुध्यांक चांगला असल्याचे दिसून आले. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय असला तरी ग्रामीण भागात मोबाईल रेंजची समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. त्यामुळे कोरोना महामारीचे हे संकट लवकर दूर होणे गरजेचे आहे. स्वाध्यायमालेच्या या उपक्रमाला ग्रामपंचायतींचे सहकार्य मिळत आहे. विविध उपक्रमांना प्रशासनाचीही चांगली साथ मिळत आहे, असेही त्या म्हणाल्या. श्री. माने म्हणाले, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या सुमारे ३२४४ विद्यार्थ्यांसाठी ही स्वाध्यायमाला तयार करण्यात आली आहे. शिक्षणाच्या प्रवाहात मुले कशी राहतील या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाद्वारे पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम असेल. ग्रामपंचायत स्तरावरून विद्यार्थ्यांना पीडीएफ प्रति उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सभापती पाताडे यांनी विचार मांडले. श्री. परुळेकर यांनी आभार मानले. फोटो- मालवण पंचायत समितीच्या उपक्रमात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page