कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेल्या व्यावसायिकांची वीज वितरणकडे मागणी
*💫मालवण दि.२९-:* कोरोना महामारी लॉकडाऊन तौक्ते चक्री वादळ या संकटांमुळे वायरी, भूतनाथ, तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने वीज बिलाचा भरणा करण्यासाठी व्यावसायिकांनी पैसे आणायचे कुठून. आर्थिक नुकसान कर्जाचा डोंगर यामुळे आमची कुटुंबे जगणार कशी असे सवाल करीत वायरी, तारकर्ली, देवबाग मधील पर्यटन व्यावसायिकांनी आज मालवणातील वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना आपली व्यथा मांडतानाच वीज मीटरचे रिडींग न घेता भरमसाठ वीज बिले काढण्यात आल्याचा आरोप करून थकीत असलेल्या वीज बिल भरणा करण्यास सवलत मिळावी अशी मागणी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेने मालवण वीज वितरणचे उपअभियंता श्री. साखरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केली कोरोना महामारी, लॉकडाऊन व तौक्ते वादळ या संकटांमुळे पर्यटन व्यवसाय बंद असून यामुळे पर्यटन व्यावसायिकांसमोर निर्माण झालेल्या वीज बिल भरणा व वीज विषयक इतर समस्यांबाबत तारकर्ली पर्यटन विकास संस्थेतर्फे वीज विभागाचे लक्ष वेधण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी व पर्यटन व्यावसायिक सदस्य यांनी मालवण वीज वितरण कार्यालयात उप अभियंता श्री. साखरे यांची भेट घेऊन त्यांना समस्यांचे निवेदन सादर करत चर्चा केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर, सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, मनोज खोबरेकर, सहदेव साळगावकर, महेश लोकेगावकर, प्रभाकर वाळवे, दादा वेंगुर्लेकर, राकेश कुंटे, शामा झाड, दर्शन वेंगुर्लेकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी बाबा मोंडकर यांनी तारकर्ली, देवबाग,वायरी भुतनाथ येथील पर्यटन व्यावसायिकांचे जून २०२१ पर्यंतचे थकीत व्यावसायिक व घरगुती वीज बिल भरण्यासाठी एक वर्षाची मुदत देऊन १२ समान हप्त्यांमध्ये बिल घेण्यात यावे, कोरोना काळात व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक वीज बिल वापरलेल्या युनिटचे ५०% पैसे आकारण्यात यावे व अन्य विविध प्रकारची आकारणी रद्द करावी. व्यावसायिकांना घरगुती वीज बिलामध्ये वापरलेल्या युनिटचे पैसे आकारण्यात यावेत, अन्य विविध आकारणी रद्द करावी, अशी मागणी केली. वायरी ते देवबाग या भागामध्ये कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावेत तसेच खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा, खराब झालेल्या वीज वाहक तारा बदलण्यात याव्यात, तसेच भूमिगत वीज वाहिन्या बसविण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी करीत मोंडकर यांनी मालवण वीज वितरण कार्यालयातील काही महिला अधिकारी या ग्राहक व व्यापाऱ्यांशी उद्धट भाषेत बोलतात त्यांना समज द्यावी असेही मोंडकर यांनी सांगितले. यावर बोलताना अभियंता साखरे यांनी वीज बिलात सवलती देणे आमच्या अखत्यारीत नाही, याबाबत वरिष्ठांकडे प्रश्न मांडून पाठपुरावा करू, वीज खंडित झाल्यास कमीत कमी वेळेत वीज पुन्हा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न रहाणार असल्याचे साखरे यांनी सांगितले.
