बिबट्याच्या दहशतीमुळे कळसुली ग्रामस्थ हवालदिल;

अंगणातील कुत्र्याची केली शिकार

*💫कणकवली दि.२८-:* बिबट्याच्या दहशतीमुळे कणकवली तालुक्यातील कळसुली परिसरातील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.काल मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास कळसुली दिंडवणेवाडी येथील अरविंद शिंदे यांच्या घरासमोरील अंगणातून झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केली आणि कुत्र्याला घेऊन पोबारा केला होता. अरविंद शिंदे यांच्या अंगणाच्या बाजूला लागूनच गोठा असल्याने गुरांनाही बिबट्यापासून धोका आहे. या प्रसंगामुळे कळसुली दिंडवणेवाडी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कळसुली दिंडवणेवाडी आणि आजूबाजूचा परिसर हा डोंगराच्या पायथ्याची येत असून या परिसरातच कळसुली गावातील धरण आहे. त्यामुळे अनेकदा येथे जंगली प्राण्यांचा वावर लोकवस्तीतूनही दिसून येतो. या भागात तीनचार महिन्यांपासून बिबट्याचा वावर अनेकदा दिसून येत आहे. कित्येकांना गुरे चारायला घेऊन गेल्यावर त्याच्या पाऊलखुणा आणि पुसटसे दर्शनही होत आहे. दोन महिन्यांपूर्वी याच वाडीतील गावकर यांच्या गायीवरही बिबट्याने झडप घालायचा प्रयत्न केला होता. तसेच अजून दोघांच्या अंगणातील कुत्र्यांची शिकार केली होती. जंगली भागातील हा बिबट्या लोकवस्तीत घुसू लागल्याने आता नागरिकांत चिंतेचे आणि भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page