कृषि समितीत कृषि अधीक्षक म्हेत्रे यांची माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे भातशेती व बाग-बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . जिल्ह्यात सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले . जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून १७ काेटी ३ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.एन. म्हेत्रे यांनी जिल्हा परिषद कृषी समिती सभेत दिली. जिल्हा परिषद कृषी समितीची सभा सभापती तथा जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य रणजीत देसाई, संजय देसाई , सायली सावंत, गणेश राणे, वर्षा पवार, अनुप्रिती खाेचरे आदीसह खाते प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. शासनाने तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून कृषी विभागासाठी १७ काेटी ३ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्व पंचनाम्यांची यादी पाठविण्यात आली नसल्याचे आपल्याला समजले असल्याबाबत समिती सदस्य गणेश राणे यांनी सभेत विचारणा केली. यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.एन. म्हेत्रे यांनी करण्यात आलेल्या सर्व पंचनाम्यांची यादी पाठविण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात चक्रीवादळामुळे नुकसान हाेऊन एक महिना हाेत आला तरी अजून जिल्ह्यातील नुकसान ग्रस्तांना अजून भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे नुकसान ग्रस्त नागरिक आम्हाला याबाबत विचारणा करत आहेत. त्यामुळे पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकां वेळी नुकसान भरपाई मिळणार आहे का ? असा प्रश्न समिती सदस्य गणेश राणे यांनी उपस्थित केला. सिंधूरत्न योजनेमध्ये पाॅवर ट्रॅक्टर योजनेचा समावेश व्हावा, याबाबत सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी लक्ष वेधत तसा ठराव शासनाकडे तातडीने पाठवावा , अशाही सूचना सभागृहात दिल्या. तसेच साळगाव येथे १ जुलै रोजी होणार्या कृषी दिनानिमित्त जिल्हास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आला असल्याची माहिती सभेत देण्यात आली. जिल्ह्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्यातील कृषी व्यवसायाला बसला होता. शेतकऱ्यांच्या फळबागायतीचे , कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचे योग्य पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली. शासनाने मंजूर केलेले १७ काेटी ३ हजार रुपये लवकरात लवकर बाधित झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे याकडे ही सदस्यांनी लक्ष वेधले.
