भंडारी हायस्कूल पटांगण वाहने उभी करण्यासाठी आरक्षित

संस्थाध्यक्षानी केली राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार

मालवण (प्रतिनिधी) गतवर्षी गणेशोत्सव काळात मालवण नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी मालवण शहरातील भंडारी ए.सो. हायस्कूलच्या पटांगणाची जागा वाहने उभी करण्यासाठी अधिग्रहित केल्याबाबत त्यास आक्षेप घेऊन जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांचे लक्ष वेधणारे भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधून याप्रश्नी दाद मागितली आहे. गतवर्षी कोरोना कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी मालवण शहरात इंसिडन्ट कमांडर म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची नेमणूक केली होती. त्यानंतर गणेशोत्सव काळात मालवण शहरात बाजारात येणाऱ्या लोकांची खाजगी वाहने उभी करून ठेवण्यासाठी भंडारी हायस्कूलच्या पटांगणाची जागा अधिग्रहित करीत असल्याचे पत्र जावडेकर यांनी भंडारी एज्युकेशन सोसायटीला दिले होते. यास संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी आक्षेप घेऊन मुख्याधिकारी एखाद्या शिक्षण संस्थेची जागा लोकांच्या खाजगी गाड्या उभ्या करण्यासाठी वाहनतळ म्हणून आदेश देऊ शकतात का ? असा सवाल उपस्थित करत मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केला होता. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्तांचे लक्ष वेधले होते. मालवण शहरात नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा असताना शाळेची जागा वाहनतळासाठी का घ्यावी ? कोणाच्याही जागेत त्यांची परवानगी न घेता त्यांना पूर्ण अंधारात ठेवून असे बेधडक आदेश देत तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे देत असतील तर ते आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला आहे असे विजय पाटकर यांनी पत्रात म्हटले आहे

You cannot copy content of this page