आझाद हिंद संघटनेचे राज्यस्तरीय आंदोलन
*💫कणकवली दि.२२-:* नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नांव देण्यात यावे यासाठी आझाद हिंद संघटनेच्यावतीने 22 जून रोजी महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा व तालुका स्तरावरुन राज्यव्यापी निवेदन सादर करण्यात आले आहे. संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई गणपत चव्हाण यांनी कणकवलीचे महसूल नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांना आज सादर केले. लोकनेते दि.बा.पाटील यांनी शेतकरी,कष्टकरी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, विधान परिषद सदस्य, पनवेल नगराध्यक्ष एवढ्या उच्च पदावर असताना सुद्धा वैयक्तिक व परिवाराच्या नावावर शुन्य रुपयांची मालमत्ता असणारे एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून दि.बा.पाटीलांचा आदर देशभर आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लोकसभेमध्ये साडेबारा टक्के जमीन अधिग्रहणाचा कायदा दि.बा.पाटलांच्या आग्रही मागणी आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे १९८४ मध्ये लागू झाला. नवी मुंबईतील विमानतळ व प्रकल्पग्रस्तांसाठी दि.बा.पाटलांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांची कर्मभूमी असलेल्या नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव देण्यात यावे या करीता आझाद हिंद संघटनेने राज्यव्यापी निवेदन आंदोलन 22 जून रोजी केले.सदर निवेदन आंदोलनाचा एक भाग म्हणून आज कणकवली तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आझाद हिंद संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
