भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष भगवान साटम यांनी दिली माहिती
*कणकवली दि.२१-:* महाराष्ट्र शासनाने एप्रिल 2021 पासून लॉकडाऊन जाहीर करताना महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना आर्थिक मदत म्हणून रुपये 1500 जाहीर केले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 672 नोंदीत घरेलु कामगारांना त्यांचे खात्यावर कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या कडून तशी आर्थिक मदत जमा करण्यात आल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष भगवान साटम यांनी दिली. एप्रिल 2021 पासून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात ब्रेक द चेन या शीर्षकाखाली लॉकडाऊन जाहीर करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असंघटित कामगारांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यामध्ये बांधकाम कामगार, रिक्षा व्यावसायिक व घरेलु कामगार यांचा समावेश आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी बांधकाम कामगारांना रुपये 1500 आर्थिक मदत मंडळ कार्यालय मुंबई येथून कामगारांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आली. त्याचप्रमाणे सन 2015 ते 2021 पर्यंत ज्या घरेलु कामगारांनी आपली घरेलु कामगार म्हणून नोंदणी केली होती अश्या घरेलु कामगारांना आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग यांनी सहकार्य केले असल्याचे भगवान साटम म्हणाले.
