कणकवली महाविद्यालयात कै.केशवराव राणे यांना अभिवादन
*💫कणकवली दि.२१-:* सध्या कोकणात सुमारे सहा लाख हेक्टर जमीन अजूनही पडीक असून या जमिनीवर आंबा, काजू, फणस, जांभूळ, कोकम,पाम,अशा विविध फळझाडांची लागवड केल्यास कोकण आर्थिक समृद्धीकडे निश्चितपणे जाईल असे ठाम प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत,फलोत्पादन महाविद्यालय, दापोली येथील फलोत्पादन अभ्यासक प्रा. महेश कुलकर्णी यांनी केले. कोकणात एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब अधिक फायदेशीर ठरेल म्हणून शेतकऱ्यांनी आंबा, काजूच्या बागेत हळद, मोहरी, झेंडू,गवती चहा अशा अन्य पिकांचे आंतरपीक घेतले तर आपण दुहेरी आर्थिक फायदा मिळऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. येथील माजी आमदार, शिक्षण महर्षी, शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन कै. केशवरावजी राणे यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘कोकणातील फलोत्पादनाच्या संधी’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्रा.महेश कुलकर्णी यांनी कणकवली कॉलेज च्या फेसबुक पेजवरुन आँनलाईन मार्गदर्शन केले. त्यापुर्वी कणकवली महाविद्यालयात कै.केशवराव राणे यांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी.डी.कामत उपस्थित होते.त्यांनी केशवराव राणे यांच्या स्मृतीला उजाळा दिला. ‘कै.केशवराव राणे साहेबांचा शैक्षणिक वारसा मोठ्या ताकदीने पुढे नेण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ प्रयत्न करीत आहे’ असे ते म्हणाले.या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त,कै.केशवराव राणे यांच्या सुकन्या प्रा.डॉ.राजश्री साळुंखे यांनीही आदरांजली वाहिली. व्याख्यानमालेत पुढे बोलताना प्रा.कुलकर्णी म्हणाले की,फणस, काजू, जांभूळ हे येथील अर्थव्यवस्थेला गतिमान करणारी फळलागवड आहे. मात्र त्याचा व्यावसायिक वापर अद्यापही पूर्णपणे करता आलेला नाही. म्हणून फणस,कोकम,तसेच बांबू या व अशा अन्य नगदी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करावी.केवळ कौटुंबिक वापराची गरज लक्षात न घेता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून उत्तम पद्धतीचे मार्केटिंग केले तर आर्थिक समृद्धी अधिक प्रमाणामध्ये होऊ शकते. नियोजनबद्ध फळझाडांची लागवड, तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन व त्या पद्धतीने आखणी करणे, खतांचा शास्त्रीय उपयोग करणे, नवनव्या बाजारपेठा,माॅल्स यांच्याशी समन्वय ठेवणे , विशिष्ट क्षेत्रात फळझाडांची लागवड करुन तेथे खरेदी आणि विक्री चे ‘क्लस्टर झोन’ विकसित करणे,व्यवसायिक दुष्टिकोन समोर ठेवणे अशा माध्यमातून कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल व येथील बेकारीचे संकट दूर करण्यासाठी फलोत्पादन हा एकमेव रामबाण उपाय असल्याचेही प्रा.महेश कुलकर्णी यांनी शेवटी सांगितले. या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे आयोजन सामाजिक विज्ञान मंडळ,कणकवली कॉलेज च्या वतीने करण्यात आले होते. या व्याख्यानाचा लाभ तीन हजारहून अधिक दर्शकांनी ऑनलाइन पद्धतीने घेतला. सर्व प्रथम प्रस्ताविक डॉ.सोमनाथ कदम यांनी केले.व शेवटी आभार प्रदर्शन प्रा.युवराज महालिंगे यांनी केले.यावेळी पर्यवेक्षक मंगलदास कांबळे,प्रा.प्रमोद कोरगावकर, डॉ.बाळकॢष्ण गावडे,प्रा.हरीभाऊ भिसे, डॉ.बाळू राठोड,प्रा.तेजस जयकर,संजय राणे, संजय ठाकुर तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
