जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य; २० ते ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज:६ सप्टेंबरला सिंधुदुर्गात परीक्षा; बारावीय उत्तीर्णांना संधी..
⚡ओरोस, ता. १९-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या शिपाई पदाच्या ३२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, इच्छुकांना २० ते ३० ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (ता. ६ सप्टेंबर) सिंधुदुर्ग येथे होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या शिपाई पदांच्या भरतीसाठी बँकेने सहकार खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सहकार खात्याने ३२ रिक्त पदांची सरळसेवा भरती करण्यास मान्यता दिल्यानंतर बँकेने ही प्रक्रिया सुरू केली आहे. भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
या पदासाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान २१ आणि कमाल ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराचा जन्म ३० ऑगस्ट २००५ नंतरचा तसेच ३० ऑगस्ट १९८६ पूर्वीचा नसावा.
‘डोमिसाईल’ आवश्यक
भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना उमेदवाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट) ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक राहणार आहे. ऑनलाइन अर्ज २० ऑगस्टपासून स्वीकारले जाणार असून ३० ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. भरतीची सविस्तर जाहिरात www.kopbankasso.co.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
६ सप्टेंबरला लेखी परीक्षा
लेखी परीक्षा ६ सप्टेंबरला सिंधुदुर्ग येथे होईल. परीक्षेचे कॉल लेटर व अन्य आवश्यक माहिती संबंधित उमेदवाराच्या ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. उमेदवारांनी कॉल लेटर डाउनलोड करून त्याची प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणावी. तसेच ओळखीच्या पुराव्यासाठी मूळ आधारकार्ड अथवा पॅनकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणानुक्रमानुसार आवश्यक संख्येतील उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार आहे.
अर्जासाठी मदत कक्ष
ऑनलाइन अर्ज भरताना अडचण किंवा शंका असल्यास उमेदवारांनी help@kopbankasso.co.in या ई-मेलवर किंवा ७४९८८५०४२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बँकेने केले आहे.
