राजन मुळीक ः नोकरदारांवर उपासमारीची वेळ
*💫बांदा दि.२०-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सिमा बंद असल्याने गोव्यात जाणाऱ्या मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघातील नोकरदार वर्गावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोरोनाचे प्रमाण घटत असले तरी नियमांचे कडक पालन करत निदान नोकरदार वर्गाचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातार्डा चेकनाका वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी जि.प.सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांच्याकडे केली आहे. कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी प्रशासनाने जिल्ह्याच्या सिमा बंद केल्या आहेत. परिणामी याचा फटका गोव्यात नेहमी जाणाऱ्या नोकरदारांना बसला आहे. वारंवार लॉकडाऊन होत असल्यामुळे बँकांचे काढलेले कर्ज फेडायचे कसे? सद्यस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा करणे कठीण झाले असल्याच्या व्यथा काही नोकरदांनी आपल्याकडे मांडल्याचे श्री. मुळीक म्हणाले. त्यामुळे काही नियम घालून निदान नोकरदारांसाठी तरी सातार्डा चेकनाका कायमचा खुला करावा, अशी मागणी राजू मुळीक यांनी केली आहे.
