मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.२०-:* राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात येऊ पाहत असताना सिंधुदुर्ग जिल्हा मात्र आजही कोरोनाशी झुंज देत आहे,वारंवार रेड झोन ठरणाऱ्या या जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार आणि आरोग्यमंत्री श्री.टोपे हे जिल्ह्याची भेट घेणार आहेत.यावेळी कंत्राटी आरोग्य कर्मचारी मागण्यांसंदर्भातचे निवेदन श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष तथा माजी जि.प.शिक्षण आरोग्य सभापती श्री.मंगेश तळवणेकर आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री. देव्या सूर्याजी यांच्या तर्फे देण्यात येणार आहे,अशी माहिती तळवणेकर,सूर्याजी यांनी दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना तळवणेकर म्हणाले,’कोरोना सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत जेवढे काम कायमस्वरूपी आरोग्य सेविका,कर्मचारी यांनी केले आहे, तसेच ते कंत्राटी आरोग्य सेविका, कर्मचारी यांनीही केले आहे.कठीण काळात त्यांनी अगदी अल्प पगारात सुध्दा न चुकता,न थांबता आपली सेवा बजावली.आपली ही सेवा बजावत असताना त्यांना पावलोपावली कष्ट सहन करावे लागले.गावातील मंडळी,कुटुंबातील व्यक्ती यांनी सुध्दा त्यांना चुकीची वागणुक दिल्याच्या अनेक घटना आहेत.राहण्यासाठी रूम न मिळाल्याने वेळप्रसंगी त्या रुग्णालयातील बेडवरच झोपलेल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील एका भगिनीला तर गावाने वाळीतच टाकले होते,याची दखल स्वतः जिल्हाधिकारी यांनी घेत त्यांना न्याय मिळवून दिला होता. आमचा सिंधुदुर्ग जिल्हा डोंगरी विभागात गणला जातो,ही विशेषबाब म्हणून आपण त्यांना कायमस्वरूपी करावे.ज्यांनी आम्हाला तुमच्या शासनाच्या भरवशावर सांभाळले त्यांना शासनाने वाऱ्यावर सोडू नये, येत्या कॅबिनेट मध्ये हा निर्णय घ्यावा.लांबचा प्रवास,कौटुंबिक कारणे इ.मुळे ऐच्छिक स्थळी बदली संदर्भात चा जीआर काढण्यात यावा.तसेच जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील जिल्हा परिषदेचेआरोग्य विभागातील वर्षानुवर्षे काम करणारे कार्यालयीन लिपिक,कंत्राटी कामगार, वॉर्डबॉय,कर्मचारी इ.ना आरोग्य भरतीत त्यांच्या कामाप्रमाणे सेवेत लागू करावे,असाही निर्णय घेण्यात यावा. पालकमंत्री श्री.उदय सामंत,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी,शल्यचिकित्सक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कोरोना लढाई सुरू असताना वैद्यकीय सुविधांचा अभाव जसे की ऑक्सिजन बेड तुटवडा,व्हेंटिलेटर ची अनुपलब्धता असतानाही यांच्या नेतृत्वात सर्वानीच आतापर्यंत जीव वाचवण्याचे काम केलेले आहे.
