माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
*💫मालवण दि.१६-:* मालवण तालुक्यातील मूळ कसबा मसुरे ग्रा. पं. क्षेत्र आताचे ग्रा. पं. मर्डे, ग्रा. पं. देऊळवाडा, ग्रा. पं. बिळवस त्याचबरोबर लगत असलेल्या ग्रा. पं. माळगाव, ग्रा. पं. कांदळगाव, ग्रा. पं. वेरळ या परिसरामध्ये कोविड 19 व कोविड सदृश्य न्यूमोनिया, सारी सारखे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. आतापर्यंत वर नमूद परिसरामध्ये सर्वसाधारण ३० लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत. खेदाची बाब म्हणजे यासंबंधीचे गांभिर्य कुठल्याच स्तरावरती दिसून येत नाही. सत्यस्थितीत या परिसरामध्ये प्रभावित असणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ग्राम पातळीपासून वरीष्ठ पातळीपर्यंत याची गांभिर्याने दखल घेणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी जि. प. सभापती संग्राम प्रभूगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ज्या वेळेला आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणासाठी घरोघरी भेटी देतात त्यावेळेस ग्रामस्थ आजाराबाबतची माहिती लपवत आहेत. त्याचबरोबर कोविड सदृश्य लक्षणे असणारे सुद्धा स्वतःची अथवा घरातील इतर माणसांची तपासणी करण्यास टाळाटाळ करत आहेत. आताच शेतीचा हंगाम सुरू होत असून हा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होऊन धोका वाढण्याची शक्यता आहे. याकरीता ग्राम पातळीवर असणाच्या ग्रामसंनियंत्रण समित्यांना, अगोदर या आजाराबाबतचे गांभिर्य व धोके व त्याबाबत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतचे शास्त्रीय मार्गदर्शन देणे व सक्षमप्रकारे कार्यरत करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नावापुरते असलेली लॉकडाऊन प्रत्यक्ष कडक स्वरूपात राबवून त्यामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांना समाविष्ट करून त्याची कडक अमंलबजावणी करणे आवश्यक आहे. यासहीत स्थानिक ग्रामसंनियंत्रण समिती सह वाडीनिहाय कमिट्या स्थापन करून कोरोना प्रसार प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याचबरोबर लसीकरण सुद्धा प्रभाविकणे राबविणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य व्यवस्था कमी पडून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता त्वरीत उपाययोजना होणे आवश्यक आहे. याचा विचार करून आपण आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत आणि हा वाढत चाललेला कोरोनाचा धोका आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी विनंती माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
