जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची पानवळ येथे भेट : स्थानिक यंत्रणेला दिल्या सूचना
*💫बांदा दि.१४-:* कोरोनाचे संकट कायम असतानाच बांदा शहरात पानवळ येथे काल तीन डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. आरोग्य यंत्रणेने याची तात्काळ दखल घेतली. बाधित रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर एस कर्तस्कर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डी जी गंगावणे यांनी पानवळ येथे भेट देत पाहणी केली. काल पानवळ येथे तीन रुग्ण सापडल्याने तात्काळ या परिसराचे आरोग्य विभागाकडून प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. आज जिल्हा आरोग्य विभागाने याची दखल घेत थेट बांद्यात येत स्थानिक आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्यात. जिल्हा आरोग्य पथकाने स्वतः पानवळ येथील घराघरात जात आरोग्य विषयक चौकशी केली. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी बाधित परिसरात ग्रामपंचायतीच्या सहकार्याने डास नियंत्रण फवारणी करण्यात आली. यावेळी कीटक संहारक सागर किनळेकर, आरोग्य सहाय्यक व्ही. के. आंबेरकर, आरोग्य सेविका कीर्ती भाईप, आरोग्यसेवक डी. एस. म्हापणकर, सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कर्तस्कर म्हणाले की, लोकांनी घाबरून न जाता आपल्या घराजवळ पाणी साठू न देता स्वछता ठेवावी. बांदा शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढता आहे. त्यातच शहरात पानवळ येथे डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाडीत रुग्ण सापडल्याने सरपंच अक्रम खान यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काल प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. मिळालेले रुग्ण हे बरे असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत या वाडीत तीन रुग्ण बाधित आढळले आहेत. परिसरात तापसरीचे रुग्ण असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यूचा प्रसार हा दूषित डास चावल्याने होतो. याचे विषाणू साठलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे घराच्या आजूबाजूला टायर, भांड्यांमध्ये पावसाचे पाणी साठू देऊ नका असे आवाहन सरपंच खान यांनी केले आहे. लोकांनी ताप, सर्दी ही लक्षणे आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य येऊन उपचार करावेत. आज या वाडीत प्रत्येक घरात सर्वेक्षण करून त्यांच्या आरोग्यविषयक नोंदी तसेच रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
