पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
*💫कणकवली दि.१४-:* कोरोना साथीचे संकट असतानाही पुरेशी माहिती न पुरविणे हा जनतेशी अप्रामाणिकपणा असून अशा अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कोरोना साथ कमी होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर राज्यात सर्वात जास्त आहे. यामागची नेमकी कारणे काय आहेत? याची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.प्रत्यक्षात काही अधिकारी माहिती पुरविण्यास टाळाटाळ करत आहेत. आपल्या सूचनेनुसार पत्रकारांचा समावेश असलेला आणि पीआरओ विजय वीर अॅडमिन असलेला व्हॉटसअॅप ग्रुप माहितीसाठी निर्माण केला. त्या ग्रुपवर अनेक पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु एकटे श्री. वीर वगळता ग्रुपमध्ये सहभागी असलेले अधिकारी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, म्हणजेच माहिती पुरवत नाहीत. जेव्हा जेव्हा साथीचे अथवा अन्य संकट येते तेव्हा-तेव्हा त्याच्याशी सामना करण्यासाठी योग्य, खरी आणि पुरेशी, तपशीलवार माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते, असे अनेक तज्ज्ञांनी यापूर्वी म्हटले आहे. आता कोरोना साथीच्या संकटातही सरकारचीही ती भूमिका आहे. असे असताना आपल्या जिल्ह्यातील काही संबंधित अधिकारी पुरेशी, तपशीलवार माहिती जाहीर करत नाहीत, हा जनतेशी अप्रामाणिकपणा आहे. अशा अधिकार्यांवर कारवाई व्हावी, असे अपेक्षित आहे. किमान खालीलप्रमाणे माहिती पत्रकारांमार्फत जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.1) साथ आटोक्यात का येत नाही याची कारणे जाहीर करावीत आणि उपायही जाहीर करावेत.2) ऑक्सिजनची गरज, पुरवठा आणि त्याचा वितरणाचा तपशील.3) औषधांचा पुरवठा.4) रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज आणि साठा.5) सरकारी रुग्णालयांमधील मनुष्यबळ.6) प्रत्येक गावात किती सक्रिय रुग्ण आहेत ही आकडेवारी सर्वात महत्त्वाची असून ती साथ रोखण्यासाठी आवश्यक आहे.7) तसेच हॉटस्पॉट जाहीर करणे आवश्यक आहे.8) लसीकरणाचा एकूण आकडा जाहीर केला जातो. परंतु शिल्लक लसी कोणत्या केंद्रावर किती आहेत याची माहिती पुरविणे आवश्यक आहे.वरील महत्त्वाचे मुद्दे असून त्याची माहिती संबंधित अधिकार्यांकडे असणारच आहे. अशी माहिती आपल्या यंत्रणेच्या प्लॅटफॉर्मवर दररोज जाहीर करणे आवश्यक आहे. अशी माहिती जाहीर करावी, अशी मागणी गणेश जेठे यांनी केली आहे.
